विद्यमान उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यामधील पहिली मेट्रो लवकरच सुरु होणार आहे. मुंबई आणि उपनगरीय शहरांना जोडणाऱ्या मेट्रोच्या महत्त्वकांशी प्रकल्पातील ‘मेट्रो-4’ आणि ‘मेट्रो 4 अ’ मार्ग या वर्षा अखेरीसपर्यंत टप्प्याटप्प्यात सुरु होणार असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे एकूण चार मार्गांवर वर्षाअखेरीसपर्यंत मेट्रो सेवा सुरु केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
कोणत्या मार्गांवर सुरु होणार सेवा?
यापैकी ‘मेट्रो-4’ वडाळ्याहून ठाण्यातील घोडबंदरवरील कासारवडवलीपर्यंत धावणार असून पुढे कासारवडवली ते गायमुख हा टप्पाही कार्यन्वयित होणार आहे. या मार्गावरील कॅडबरी जंक्शन ते गायमुख दरम्यान ही मेट्रो धावणार आहे. म्हणजेच वडाळा ते गायमुख मार्गावरील 10 स्थानकांवरील सेवा सुरु होणार आहे. याचप्रमाणे ‘मेट्रो 2 बी’ (मंडाळे ते चेंबूर) आणि ‘मेट्रो 9’ (दहीसर ते काशीगाव) मार्गावरील मेट्रो सेवाही पुढील 10 महिन्यांमध्ये म्हणजेच डिसेंबरपर्यंत सुरु होणार आहे. म्हणजेच वर्षाच्या शेवटपर्यंत मुंबई आणि उपनगरीय शहरांमधील चार मेट्रो मार्गांचा पहिला टप्पा सुरु होणार आहे.
सुरुवातीला केवळ 10.5 किमी मार्गावर सुरु होणार सेवा
‘मेट्रो-4’चा मार्ग 32.32 किलोमीटरचा असून याच मार्गाचं एक्सटेन्शन असलेली ‘मेट्रो-4 अ’ हा अवघ्या 2.7 किलोमीटरचा मार्ग आहे. दोन्ही मर्गांवर एकूण 32 स्थानकं आहेत. यापैकी पहिला टप्पा म्हणजेच 10.5 किलोमीटरचा मार्ग डिसेंबरमध्ये सुरु होणार आहे. या मार्गावर मेट्रो सुरु झाल्याने रस्त्यावरील वाहतुक कोंडीमधून ठाणेकरांना सुटका मिळणार आहे.
…म्हणून सुरु होतेय सेवा
‘मेट्रो-4’साठी कारशेड उभारण्याचं काम सुरु आहे. यासाठी अधिक वेळ लागू शकतो. पण एमएमआरडीएचे महानगर आयुक्त संजय मुखर्जींनी पदाभर स्वीकारल्यानंतर कारशेडशिवाय मेट्रो सुरु करण्यासंदर्भातील चाचपणीचे आदेश दिले आहेत. अतिरिक्त टेस्टींग लाइन उभारुन मेट्रो सेवा सुरु केली जाऊ शकते, त्यामुळे मेट्रो लाइन किमान 10 किलोमटरच्या मार्गावर सुरु करण्याची तयारी प्रशासनाने सुरु केली आहे.
‘मेट्रो 4’ आणि ‘मेट्रो-4 अ’ मार्गावरील स्थानकं कोणती?
कॅडबरी जंक्शन > माजीवाडा > कापूरबावडी > टिकुजीनीवाडी > विजय गार्डन > गोवनीवाडा > मानपाडा > डोंगरीपाडा > कासारवडवली > गोवनीवाडा > गायमुख
‘मेट्रो 9’ मार्गावरील स्थानकं
दहीसर > पांडुरंगवाडी > काशीगाव
‘मेट्रो 2 बी’वरील स्थानकं
मंडाळे > मानखुर्द > बीएसएनएल > शिवाजी चौक > डायमंड गार्डन
