Boat Accident: समोर मोठी बोट दिसत असतानाही स्पीड बोट कशी धडकली? खरं कारण उघड, 140 Kmph…
मुंबईतील समुद्रामध्ये नौदलाच्या स्पीड बोटीने प्रवासी वाहतूक करणाऱ्या बोटीला धडक दिल्याने 13 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. मृतांमध्ये 2 बालकांचाही समावेश आहे. या अपघातानंतर बेपत्ता असलेल्या दोन प्रवाशांचा शोध दुसऱ्या दिवशीही सुरु आहे. अशातच समोर एवढी मोठी प्रवासी बोट दिसत असतानाही स्पीड बोट कशी काय तिला धडकली? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र नेमकं काय घडलं याबद्दलची माहिती नौदलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
नेमकं घडलं काय?
नौदलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या स्पीड बोटचा अपघात झाला तिचं इंजिन नव्यानेच बसवण्यात आलं होतं. या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने हा अपघात घडल्याची माहिती नौदलाकडून देण्यात आली आहे. नेमकं या बोटीसंदर्भात काय घडलं? तांत्रिक अडचण का आणि कशी निर्माण झाली याबद्दलचा शोध घेण्यासाठी सविस्तर, सखोल चौकशी सुरु करण्यात आली आहे. प्रथम दर्शनी हा अपघात नव्याने बसवलेल्या इंजिनमधील तांत्रिक बिघाडामुळेच झाल्याचं सांगितलं जात आहे. या बोटीचं नियंत्रण कोणाच्या हाती होतं याबद्दलची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या बोटीवर नौदलाचे दोन अधिकारी आणि त्यांच्यासोबतीने इतर चार सहकारी होते. पण अपघात झाला तेव्हा बोट कोण चालवत होतं याबद्दलची माहिती समोर येत आहे.
काय करत होती ही बोट?
“एखाद्या बोटीचा इंजिन किंवा इतर मोठा भाग बदलला जातो तेव्हा त्याच्या सखोल चाचण्या घेतल्या जातात. ऐनवेळी काही गोंधळ होऊ नये म्हणून सर्व काळजी घेतली जाते. उदाहरण सांगायचं झालं तर जर इंजिन बनवणाऱ्या कंपनीने इंजिनची क्षमता 140 किलोमीटर प्रती तास इतकी असेल तर नौदलाकडून त्यांच्या हा दावा तपासून पाहिला जातो. अशीच चाचणी अपघात झाला तेव्हा सुरु होतील,” अशी माहिती नौदल अधिकाऱ्यांनी दिली आहे. अपघात झाला तेव्हा बोटीवर चार नौदल अधिकाऱ्यांबरोबरच 2 ओरिजनल इक्विपमेंट मॅनफॅक्चरर (ओईएम) सुद्धा होते. या अपघातामध्ये नौदलाचे महेंद्र सिंग शेखावत आणि दोन ओईएम प्रविण शर्मा आणि मंगेश नावाच्या तीन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.
अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल
चालकाचं बोटीवरील नियंत्रण सुटलं का? यासंदर्भातील तपासही नौदलाने सुरु केला आहे. निलकमल बोटीला या स्पीड बोटने धडक दिली तेव्हा ही बोट गेट वे ऑफ इंडियावरुन एलिफंटा गुहांच्या दिशेने जात होती. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी नौदल्याच्या स्पीट बोटीवर असलेल्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
कोणी शूट केला तो व्हिडीओ?
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात झाला तेव्हाचे क्षण मोबाईल कॅमेरामध्ये कैद करणाऱ्या प्रवाशाचं नाव नथाराम चौधरी असं आहे. नथारामने शूट केलेला व्हिडीओच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुंबई पोलिसांनी नौदलाच्या अधिकाऱ्यांविरोधात नथारामच्या तक्रारीनुसारच गुन्हा दाखल केला आहे.