‘पूजा चव्हाण मृत्यूसंदर्भात फडणवीसांची…’, ठाकरेंनी सगळंच काढलं; मोदींच्या ‘त्या’ इच्छेचाही उल्लेख
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं खोचक शब्दांमध्ये निशाणा साधला आहे. भारतीय जनता पार्टीबरोबरच एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची यादीही केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या नजरेखालून गेल्यानंतर मंजूर झाल्यानंतरच आल्याचा टोला ठाकरेंच्या शिवसेनेनं लगावला आहे. इतक्यावरच न थांबता ठाकरेंच्या शिवसेनेनं पूर्वी फडणवीस यांनी ज्या ज्या नेत्यांवर आरोप केलेले त्यांचाच आता आपल्या मंत्रिमंडळात समावेश केल्यावरुनही मुख्यमंत्र्यांना कानपिचक्या दिल्या आहेत.
लाडक्या बहिणींवरचे प्रेम म्हणजे ढोंग हे सिद्ध झालं
“नागपुरात रविवारी मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. दिल्लीहून याद्या मंजूर होऊन आल्यावर मंत्र्यांनी शपथ घेतली. स्वाभिमान वगैरेसाठी ज्यांनी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस सोडली अशा शिंदे-अजित पवार गटांच्या याद्याही दिल्लीत अमित शहांच्या नजरेखालून मंजूर होऊन आल्या व त्यानुसार मंत्र्यांच्या शपथग्रहणाचा कार्यक्रम पार पडला. छगन भुजबळ, सुधीर मुनगंटीवार, रवींद्र चव्हाण अशा प्रमुख नेत्यांना वगळले आहे. तानाजी सावंत, दीपक केसरकर यांना दिल्लीच्या आदेशाने नारळ देण्यात आला, पण संशयास्पद मृत्यू झालेल्या पूजा चव्हाण प्रकरणातील मंत्री संजय राठोड यांना मंत्रीपदाची शपथ दिल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांचे लाडक्या बहिणींवरचे प्रेम म्हणजे ढोंग आहे हे सिद्ध झाले,” असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
पूजा चव्हाण, ‘चक्की पिसणे’ सारंच काढलं
“पूजा चव्हाण मृत्यूसंदर्भात तत्कालीन विरोधी पक्षनेते फडणवीस यांची भूमिकाही ‘आपटाआपटी’ची होती. राठोड यांचा राजीनामा घेऊन त्यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे ते म्हणाले होते, पण आता त्याच फडणवीसांच्या मंत्रिमंडळात संजय राठोड आहेत. अजित पवार, हसन मुश्रीफ यांना फडणवीस ‘चक्की पिसायला’ पाठवणार होते. स्वतः पंतप्रधान मोदी यांचीच तशी इच्छा होती. हे दोघेही आता महाराष्ट्र बळकट करण्यासाठी फडणवीसांना मदत करतील,” असा टोला ‘सामना’च्या अग्रलेखामधून लगावण्यात आला आहे.
“सरपंच संतोष देशमुखच्या हत्येचे रक्त ज्यांच्यावर उडाले आहे अशा…”
“बीडमध्ये हिंसाचार, रक्तपात, खुनाखुनी, खंडणीखोरीचा कहर उडाला आहे. सरपंच संतोष देशमुखच्या हत्येचे रक्त ज्यांच्यावर उडाले आहे अशा धनंजय मुंडे यांना मंत्री करण्यात आले आहे. सोबत पंकजा मुंडे यांनाही संधी मिळाली. गणेश नाईक हे भाजपच्या कोट्यातून मंत्री झाले. त्यांचे चिरंजीव संदीप नाईक हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षातून निवडणूक लढले होते. शिंदे गटातून अनेकांचे तीन वर्षांपासून टांगलेले कोट या वेळी अंगावर चढले, पण त्या गटातील अनेकांची तडफड ही मनोरंजन करणारी आहे,” असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.