ओव्हर टाइमचे पैसे मिळणार, कामाचे तास ठरणार, ऑफिसमधल्या छळाविरोधात नवा कायदा? खासगी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना दिलासा?
तृणमूल काँग्रेसचे खासदार संकेत गोखले यांनी शुक्रवारी केंद्र सरकारकडे एका विशेष कायद्याची मागणी केली आहे. खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा विचार करुन काम करण्यासाठी उत्तम वातावरण असेल यासंदर्भातील कायदा करण्याची मागणी गोखले यांनी केली आहे. कामासंदर्भातील तणावामुळे अनेक कर्मचाऱ्यांचे मृत्यू होत असल्याचा दावाही आपली मागणी संसदेच्या सभागृहामध्ये ठेवताना गोखले यांनी केला.
‘कामाचा भरपूर ताण घेतल्याने’ मृत्यू
सध्या हिवाळी अधिवेशन सुरु असून राज्य सभेच्या शून्य प्रहरामध्ये गोखले यांनी आपला मुद्दा मांडला. यावेळेस गोखले यांनी काही आठवड्यांपूर्वी अॅना सेबॅस्टीयन या चार्टड अकाऊटंटचा मृत्यू झाल्याचा संदर्भही दिला. पुण्यामधील या महिलेचा ‘कामाचा भरपूर ताण घेतल्याने’ मृत्यू झाल्याचा दावा गोखले यांनी सभागृहात बोलताना केला. तसेच त्यांनी पत्रकार सतिश नांदगावकर यांचा मृत्यू, ‘कामाच्या ठिकाणच्या घातक परिस्थितीमुळे’ झाला आहे असंही म्हटलं आहे.
उत्तम आर्थिक परतावाही मिळायला हवा
“कामाच्या ठिकाणी असलेल्या या घातक परिस्थीमुळे अनेकांना तणावाचा सामना करावा लागत असून या सभागृहामध्ये सदर विषयावर चर्चा करुन तो गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे. जे लोक खासगी कंपन्यांमध्ये काम करता त्यांना काम करण्यासाठी आरोग्यदायी आणि सुरक्षित ठिकाणांची हमी मिळायला हवी. तसेच त्यांना यासाठी उत्तम आर्थिक परतावाही मिळायला हवा,” असं गोखले यांनी म्हटल्याचं वृत्त पीटीआयने दिलं आहे.
असले बरेच प्रकार होतात
संकेत गोखले यांनी कामाच्या ठिकाणी असलेली असुरक्षित वाटणारी परिस्थिती आणि कंपन्यांसंदर्भातील तक्रारी सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात दिसून येत आहेत, असंही म्हटलं. काही घटना समोर आल्यानंतर आता कर्मचारी ‘टॉक्सिक वर्क कल्चर’बद्दल उघडपणे बोलू लागले आहेत. अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांना ठरवून दिलेल्या वेळापेक्षा अधिक काळ काम करावं लागतं. तसेच कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांचा अनेकदा अपमानही केला जातो असंही गोखले यांनी आपली भूमिका मांडता आवर्जून नमूद केलं. “खासगी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये असले बरेच प्रकार होत आहेत,” असं गोखले राज्य सभेमध्ये आपली बाजू मांडताना म्हटले.
आयकर भरणाऱ्यांनाच भरावा लागतोय कर
“आपण केवळ खासगी कंपन्यांबद्दल बोलत आहोत. बंगला म्हणजेच उद्योग धंदे असा हिशोब आहे. आमच्या राज्यामध्ये साडेचार लाख सक्रीय कंपन्या आहेत. त्यापैकी केवळ माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातून 2 लाख 60 हजार लोकांना रोजगार मिळाला आहे. त्यामुळेच खासगी क्षेत्रामध्ये बदल करणं फार महत्त्वाचं आहे. या वर्षी आयकरापेक्षा कॉर्परेट कर फार कमी आहेत. आयकर कोण भरतं? खासगी क्षेत्रात काम करणारे कर्मचारीच ना?” असा सवाल गोखलेंनी विचारला. खासगी क्षेत्रातील कंपन्यांमध्येही ठरलेल्या तासापेक्षा अधिक वेळ काम करावं लागलं तर ओव्हर टाइमचे पैसे दिलेत जावेत अशी मागणीही गोखले यांनी केली आहे. तसेच एका ठराविक मर्यादेपेक्षा अधिक तास कर्मचाऱ्यांना काम करायला लावलं जाऊ नये अशी अपेक्षाही गोखलेंनी व्यक्त केली.
कॉन्ट्रॅक्टवर असणाऱ्यांना ओव्हर टाइमचे पैसे द्या
“ओव्हर टाइमचे पैसे देण्याची पद्धत भारतामध्ये कंत्राटावर म्हणजेच कॉनट्रॅक्टवर भरती करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी लागू होत नाही. कर्मचाऱ्यांना 8, 10 ते 12 तास काम करायला लावतात. अनेकज कर्मचारी क्लायटंशी संबंधित कामं करतात. तिथे अनेकदा त्यांना अपमान सहन करावा लागतो. यासाठी कामगार कायद्यात योग्य तरतूद असणं गरजेचं आहे,” असंही गोखलेंनी आपली बाजू मांडली. आता गोखले यांच्या मागणीवर सरकार काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.