पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे धारदार चाकूने सपासप वार करत एका ३३ वर्षीय विवाहित महिलेचा निर्दयीपणे खून करण्यात आला आहे. सुनिता दादाराम शेंडे (वय ३३ वर्ष) असे खून झालेल्या महिलेचे नाव असल्याची माहिती आहे. या घटनेने इंदापूर तालुका हादरला आहे. विशेष म्हणजे सुनिता दादाराम शेंडे यांची हत्या केल्यानंतर आरोपी स्वत: पोलिस ठाण्यात पोहोचला आणि पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीने इतक्या भयानक पद्धतिने सुनिता यांना का संपवलं याचं कारण मात्र अद्याप समोर आलेलं नाही. सध्या पोलिसांनी आरोपीला अटक केली असून तपासाला सुरुवात केली आहे.
सदरची घटना इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील सराफवाडी रोडवरील पत्र्याच्या शेडखाली बुधवारी (४ डिसेंबर) सायंकाळी घडली. या खून प्रकरणी इंदापूर तालुक्यातील सुरवड येथील आरोपी ज्ञानेश्वर बबन रासकर (रा. सुरवड ता. इंदापुर जि.पुणे ) याच्यावर इंदापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.
मृत महिला जानाई लक्ष्मी महिला सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा होत्या
मृत विवाहित सुनिता शेंडे या जानाई लक्ष्मी महिला सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा असुन समता परिषदेचे माजी जिल्हाध्यक्ष दादासाहेब शेंडे यांच्या त्या पत्नी आहेत. त्यांचा खून झाल्याने तालुक्यात खळबळ माजली आहे.सदरच्या खुणाबाबतचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, इंदापूर पोलीस या घटनेचा अधिकचा तपास करीत आहेत.
