मोदी येणार, समर्थकांची तोबा गर्दी होणार; मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी मुंबईतील वाहतुकीत मोठे बदल
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अखेर सत्तास्थापनेचा तिढा सुटला आणि महायुतीच्या सरकारस्थापनेचा दिवस उजाडलाल. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा विराजमान होण्यास सज्ज झाले असून, त्यांच्या नेृतृत्त्वातील नवनिर्वाचित मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा दक्षिण मुंबईतील आझाद मैदान इथं पार पडणार आहे.
शपथविधी सोहळ्यासाठी इथं मागील काही दिवसांपासून जोरदार तयारी सुरू असून, या खास क्षणी खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुतीच्या असंख्य समर्थकांची हजेरी पाहायला मिळणार आहे. सदर परिसरामध्ये होणारी गर्दी लक्षात घेता कायदा आणि सुव्यवस्था राखत सामान्य नागरिकांना दैनंदिन प्रवासामध्ये कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी मुंबई आणि प्रामुख्यानं दक्षिण मुंबईतील वाहतूक मार्गांमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.
गुरुवारी दुपारी 12 वाजल्या पासून वाहतूक पोलिसांच्या वतीनं हे नियम लागू करण्यात येणार असून, शपथविधी सोहळ्याच्या कार्यक्रम सुरू असेपर्यंत हे नियम लागू असतील असं यंत्रणेकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान, शपथविधी सोहळ्यासाठी येणाऱ्या समर्थक आणि कार्यकर्त्यांनी या परिसरामध्ये वाहनं उभी करण्याची व्यवस्था नसल्यानं रेल्वे मार्गानं प्रवास करण्याला प्राधान्य देण्याचं आवाहनही पोलिसांनी केलं आहे.
शपथविधीच्या निमित्तानं आझाद मैदान परिसरात मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांसह महत्त्वाच्या आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्ती येणार असल्यामुळे सामान्य नागरिकांनी आझाद मैदान आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस (सी एस एम टी) या मार्गानं प्रवास करताना वेळेचं योग्य नियोजन करावं अथवा पर्यायी मार्गांचा वापर करावा अशा सूचना शहर पोलीस विभाग आणि वाहतूक पोलिसांच्या वतीनं करण्यात येत आहेत.
वाहतुकीतील बदल पुढीलप्रमाणे
छत्रपती शिवाजी महाराज जंक्शन (सीएसएमटी जंक्शन ) ते वासुदेव बळवंत फडके चौक (मेट्रो जंक्शन) च्या दोन्ही मार्गिका वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येतील. या मार्गानं प्रवास करणाऱ्यांनी एल. टी. मार्ग, चकाला जंक्शनवरून उजवं वळण घेत डी. एन. रोड छत्रपती शिवाजी महाराज जंक्शन (सीएसएमटी जंक्शन) या पर्यायी मार्गाचा वापर करावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. महात्मा गांधी मार्गही आवश्यतेनुसार बंद ठेवण्यात येणार असल्यामुळे वाहन चालकांनी एल.टी. मार्ग चकाला जंक्शनवरून उजवं वळण घेत डी. एन रोड, सीएसएमटीवरून इच्छितस्थळी प्रवास करण्याच्या सूचना वाहतूक पोलिसांकडून करण्यात आल्या आहेत.
हजारीमल सोमानी मार्गावरील वाहतूक चाफेकर बंधू चौक (ओ. सी. एस. जंक्शन) ते छत्रपती शिवाजी महाराज जंक्शनपर्यंत (सीएसएमटी जंक्शन) वाहतूक शपथविधीदरम्यान बंद राहील. पर्यायी व्यवस्था म्हणून चाफेकर बंधू चौक (ओ. सी. एस. जंक्शन) हुतात्मा चौक – काळा घोडा, के. दुभाष मार्ग – शहिद भगतसिंग मार्गाचा वापर करण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलं आहे. दरम्यान, प्रिन्सेस स्ट्रिट पूल (मेघदुत ब्रिज) (दक्षिण वाहिनी) (एन. एस. रोड, तसेच सागरी किनारा मार्गाने श्यामलदास गांधी जंक्शनकडे जाणारी वाहतूक गरजेनुसार बंद ठेवण्यात येईल. इथून जाणारी वाहनं एन. एस. रोड मार्गे वळवण्यात येतील.
रामभाऊ साळगांवकर रोड (एक दिशा मार्ग) रामभाऊ साळगांवकर रोडवरील इंदु क्लिनिक जंक्शन (सय्यद जमादार चौक ते व्होल्गा चौक सर्व प्रकारच्या वाहनांसाठी दुहेरी मार्गिका दुपारी 12 ते रात्री 8 दरम्यान खुली करण्यात येत आहे.