देश

‘शिवशाही’ची चाकं कायमची थांबणार? एसटी महामंडळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

लालपरीचा प्रवास म्हणजे सर्वसामान्यांसाठी खूप सोयीचा असतो. एसटी महामंडळाने एसटीच्या ताफ्यात अनेक बस दाखल केल्या आहेत. शिवशाही, शिवनेरी, एसी बस यासारख्या अनेक बस खेडोपाड्यात धावत असतात. मात्र, आता एसटी महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यातून शिवशाहीचा प्रवास आता संपणार असल्याची शक्यता आहे. वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर एसटी प्रशासनाने शिवशाही बसची सेवा थांबविण्याचा निर्णय घेऊ शकतात आहे. शिवशाही बस गाड्यांमध्ये तांत्रिक दोष असल्याचे निष्पन्न झाल्यावर प्रशासन हा मोठा व महत्त्वाचा निर्णय घेऊ शकते.

शिवशाही बसच्या अंतर्गत व बाह्य रचनेत आवश्यक तो बदल केला जाणार असून त्याचे रूपांतर साध्या अर्थात ‘लालपरी’ बसमध्ये होणार असल्याची शक्यता आहे. अलीकडेच गोंदिया येथे शिवशाही बसच्या अपघातात 11 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. यापूर्वीदेखील शिवशाही बसचे अपघात झाले होते. शिवशाही बसचे होणारे अपघात पाहता आधापासून त्यात तांत्रिक दोष असल्याचे समोर आले आहे. वारंवार तक्रारी वाढल्याने एसटी प्रशासनाच्या वाहतूक विभागाने शिवशाहीला सेवेतून काढून टाकण्याचा प्रस्ताव दिला. येत्या काही महिन्यातच शिवशाहीचा प्रवास संपणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय.

सध्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात एकूण 892 शिवशाही बस आहेत. त्यापैकी 500 बस धावत असून उर्वरित 392 बस कार्यशाळेत विविध कारणांसाठी दाखल झाल्या आहेत. शिवशाही बस या एसी बस होत्या. मात्र आता त्याचे लालपरीत रुपांतर करण्यासाठी वातानुकूलित यंत्रणा काढण्यात येणार असून काही आवश्यक बदल केले जाणार आहेत. शिवशाहीचे रूपांतर साध्या बसमध्ये केले जाणार आहे.

शिवशाही बस सुरुवातीपासूनच वादात अडकलेल्या होत्या. नियोजनाचा अभाव, ठेकेदारांची मनमानी, तसंच, वारंवार होणारे अपघात याबरोबरच तिकिट दर जास्त असल्याने शिवशाही सुरुवातीपासून वादाच्या भोवऱ्यात अडकल्या होत्या. वारंवार प्रशासनाकडे तक्रारी देखील केल्या होत्या. मात्र, त्यावर एसटी प्रशासनाने आता निर्णय घेतला आहे.

दरम्यान, पहिल्यांदा शिवशाही बस 10 जून 2017 रोजी मुंबई-राजगिरी मार्गावर धावली होती. तत्कालीन परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून शिवशाही बस सुरू करण्यात आली होती.

गोंदिया अपघात कधी झाला?
29 नोव्हेंबर रोजी गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी ते गोंदिया रोडवर शिवशाही बसचा अपघात झाला होता. सकाळी भंडारा आगारातून बस गोंदियाला जात असताना गोंदिया सडक अर्जुनी मार्गावर बिंद्रावन टोला गावाजवळ शिवशाही बस अनियंत्रीत झाली व रोडाच्या बाजूला उलटल्याने अपघात झाला. या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला असून 30 जण गंभीर जखमी झाले होते. सरकारने मृतांना 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली होती.

Related Articles

Back to top button