Mumbai Water Cut: 22 तास बंद राहणार पाणीपुरवठा! ‘या’ भागांना बसणार मोठा फटका; पाहा टाइमटेबल
दादर आणि लोअर परळमध्ये 22 तास पाणीपुरवठा खंडित राहणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळेच दादर आणि परळवासीयांसाठी मुंबई महानगरपालिकेने अत्यंत महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. अत्यंत महत्वाची माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे. आज म्हणजेच गुरुवार, 28 नोव्हेंबर रोजी रात्री 10 वाजल्यापासून पाणीपुरवठा बंद असणार आहे.
कधी आणि किती ते किती वाजेपर्यंत बंद राहणार पाणीपुरवठा
लोअर परळ भागामधील 1450 मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी दुरुस्त केली जाणार आहे. तानसामधून येणारी ही जलवाहिनी दुरुस्तीचं काम आज रात्री 10 वाजल्यापासून सुरु होणार आहे. त्यामुळेच 28 नोव्हेंबर रात्री 10 वाजल्यापासून ते 29 नोव्हेंबर रात्री 8 वाजेपर्यंत हे दुरुस्तीचं काम केलं जाणार आहे. त्यामुळेच या 22 तासांसाठी येथील पाणीपुरवठा पूर्णपणे ते अंशत: बंद राहणार आहे. याचा मुख्य फटका लोअर परळ (जी दक्षिण), दादर, प्रभादेवी (जी उत्तर) आसपासच्या विभागातील काही परिसराला बसणार आहे.
नेमकं कुठे होणार काम?
जलअभियंता विभागातर्फे वरळी येथील सेनापती बापट मार्गावरील गावडे चौकातील तानसा मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेणार आहे. गुरुवारी रात्री 10 वाजल्यापासून हे काम सुरू होणार आहे. हे काम 22 तासांनी म्हणजेच शुक्रवारी रात्री 8 वाजता ते पूर्ण होईल. या कामासाठी जलअभियंता विभागाला जलवाहिनीचा पाणीपुरवठा बंद करावा लागणार आहे. दुरुस्तीच्या प्रत्यक्ष कालावधीत पालिकेच्या ‘जी दक्षिण’ व ‘जी उत्तर’ विभागातील परिसरांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही, असं जाहीर करण्यात आलं आहे. नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक तो साठा करून ठेवावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.
दादर, लोअर परळमधील या विभागांमध्ये पाणीपुरवठा राहणार बंद
संपूर्ण प्रभादेवी परिसर, पी. बाळू मार्ग, हातिसकर मार्ग, करी रोड, सखाराम बाळा पवार मार्ग, भवानी शंकर मार्ग, महादेव पालव मार्ग, लोअर परळ परिसर, ना. म. जोशी मार्ग, बीडीडी चाळ, पांडुरंग बुधकर मार्ग, गणपतराव कदम मार्ग, गोखले मार्ग, काकासाहेब गाडगीळ मार्ग, सयानी मार्ग,, आदर्शनगर, जनता वसाहत, अप्पासाहेब मराठे मार्ग, वीर सावरकर मार्ग, सेनापती बापट मार्ग.
अंशतः पाणीपुरवठा बंद राहणार असलेली ठिकाणं
गोखले मार्ग, अरुणकुमार वैद्य मार्ग, सेनापती बापट मार्ग, एल. जे. मार्ग, वीर सावरकर मार्ग, परिसराचा पाणीपुरवठा अंशतः म्हणजेच 33 टक्के बंद राहणार आहे.