सर्वात मोठी बातमी! पुढील 2 तासात शिंदे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार? नवे मुख्यमंत्री…
राज्य सरकारचा कार्यकाळ आज संपणार आहे. 26 नोव्हेंबर ही विद्यमान विधानसभेच्या कार्यकाळाची शेवटची तारीख असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. मात्र नवे मुख्यमंत्री निवडेपर्यंत राज्याचा कारभार शिंदेच पाहणार असल्याचे समजते. सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द करणार असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र कार्यवाहू मुख्यमंत्री म्हणून ते नवं सरकार स्थापन होईपर्यंत कारभार संभाळणार आहेत. (दिवसभरातील घडामोडींचे LIVE UPDATES पाहाण्यासाठी येथे क्लिक करा.)
विधानसभा होणार बरखास्त
मुख्यमंत्री कोण याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना विधानसभेचा पंच वार्षिक कार्यकाळ संपलेला आहे. विधानसभेचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने तांत्रिक बाब म्हणून यासाठी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागतो. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतरच विधानसभा बरखास्त होते. मुख्यमंत्री सकाळी 11 वाजता राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द करतील अशी सूत्रांची माहिती आहे. पुढील मुख्यमंत्री कोण हे निश्चित होत नाही तोपर्यंत कार्यवाहू मुख्यमंत्री म्हणून शिंदेच जबाबदारी पाहतील असं सांगितलं जात आहे. नवीन विधानसभा अस्तित्वात आल्यानंतर कारभार नव्या मुख्यमंत्र्यांकडे सोपवला जाईल. मुख्यमंत्र्यांचा राजीनामा हा मंत्रिमंडळाचा राजीनामा समजला जात असल्याने मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याबरोबरच मंत्रिमंडळही बरखास्त होणार आहे.
दबाव तंत्राचा वापर
मुख्यमंत्री पदासाठी भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडूनही जोर लावला जात असल्याचं चित्र दिसत आहे. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंच कायम रहावेत असं त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी मागील दोन दिवसांमध्ये वेगवगेळ्या प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. यामध्ये दीपक केसरकर, संजय शिरसाट यासारख्या नेत्यांचा समावेश आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घ्यावी असं भाजपाच्या कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं भाजपा नेत्यांनी बोलून दाखवलं आहे. यामध्ये प्रवीण दरेकर, राहुल नार्वेकर यांच्यासहीत आशिष शेलार यांचाही समावेश आहे ज्यांनी मुख्यमंत्री पदासाठी फडणवीस असावेत अशी मागणी केली आहे.
केंद्रीय नेतृत्वाच्या माध्यमातून होणार चर्चा
भारतीय जनता पार्टीने विधानसभा निवडणुकीमध्ये 132 जागांवर विजय मिळवला असून शिंदेंच्या शिवसेनेनं 57 जागांवर विजय मिळवला आहे. अजित पवारांच्या पक्षाने 41 जागांवर विजय मिळवला आहे. महायुतीचा मुख्यमंत्री कोण यासंदर्भात केंद्रीय नेतृत्वाशी बोलून आम्ही योग्य तो निर्णय घेऊन असं एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वेळोवेळी सांगितलं आहे.
दरम्यान आज मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे निश्चित होणार असून उद्या म्हणजेच बुधवारी मुख्यमंत्री पदी कोण असेल याची घोषणा होण्याची शक्यता आहे.