Maharashtra Breaking News LIVE Updates: कोल्हापूरात घडामोडींना वेग; सतेज पाटलांनी बोलावली तातडीची बैठक
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ निवडणुकीतून मधुरीमाराजे छत्रपती यांनी माघार घेतल्यानंतर काँग्रेसमध्ये अस्वस्थता असून याच पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या अजिंक्यतारा ऑफिसवर इंडिया आघाडीची तातडीची बैठक बोलावली आहे. बैठकीला सतेज पाटील यांच्यासह इंडिया आघाडीचे घटक पक्ष उपस्थित आहेत. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात घडलेल्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. आजच्या बैठकीत विधानसभा निवडणुकीला कसं सामोरे जायचं याबाबत विचारमंथन केलं जाणार आहे.
महाविकास आघाडीच्या वडाळा विधानसभेच्या अधिकृत उमेदवार श्रद्धा जाधव यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे यांचा मुंबईत रोड शो होत आहे. आज सायंकाळी 6 वाजता होणार रोड शोला सुरवात होईल. उद्धव ठाकरे यांच्या सभांना आजपासून सुरवात झाली असून दुसरीकडे आदित्य ठाकरे देखील प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विधानसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा उद्या प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात येणार आहे. जाहीर नाम्यात सरकार आल्यास लाडकी बहीण योजना पुढील 5 वर्ष सुरू ठेवण्याच आश्वासन देण्यात येणार
निवडणूक प्रशिक्षणास जिल्ह्यातील ३ हजार कर्मचारी गैरहजर. गैरहजर राहिलेल्या कर्मचाऱ्यांना नोटीस द्यायला सुरुवात. मागील काही दिवसांपासून निवडणूक प्रशिक्षण सुरू आहे. पुढील प्रशिक्षणास गैरहजर राहिल्यास कारवाईची टांगती तलवार कायम असणार. 24 तासात खुलासा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. 21 विधानसभा मतदारसंघात कर्मचाऱ्यांना निवडणुकीचं प्रशिक्षण दिलं जात आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख रुपेश म्हात्रे यांची पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. तसेच यवतमाळ जिल्ह्यातील विश्वास नांदेकर – जिल्हाप्रमुख वणी विधानसभा, चंद्रकांत घुगूल झरी तालुकाप्रमुख, संजय आवारी – मारेगाव तालुकाप्रमुख, प्रसाद ठाकरे वणी तालुकाप्रमुख यांचीही पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असून शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून ही माहिती देण्यात आली.
नवी मुंबईतील घणसोली येथे क्रीडा संकुलासाठी राखीव असलेली जागा खासगी बिल्डरना देण्याचा सिडको चा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी रद्द ठरवला. भारताचे मुख्य न्यायाधीश (CJI) डी वाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती जे बी पारदीवाला व मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने शहरांमध्ये हिरव्या जागा राखून ठेवण्याच्या महत्त्वावर भर दिला. “मुंबईसारख्या शहरांमध्ये आपल्या मुलांसाठी हिरव्या जागांची गरज आहे,” असे मत सरन्यायाधीशांनी यांनी केले. सरन्यायाधीश पुढे म्हणाले की, “मुंबई आणि नवी मुंबई सारख्या शहरांमध्ये आता फारच कमी हिरवे फुफ्फुस शिल्लक आहेत, आणि त्यांचे संरक्षण करणे आवश्यक आहे. शहरांमध्ये आता केवळ उंचच उंच इमारतीच होत आहेत, त्यामुळे उरलेल्या जागांवर बांधकाम करण्यापेक्षा त्यांचे जतन करणे आवश्यक आहे.”
सिंधुदुर्ग – भाजपा बंडखोर उमेदवार तथा भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांची हकालपट्टी. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून विशाल परब यांनी केलीय बंडखोरी. वरिष्ठांनी समज देऊन देखील विशाल परब यांनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केली हकालपट्टी. निवडणूक काळात विशाल परब यांना मदत करणाऱ्या भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर देखील दिले कारवाईचे संकेत.
पुण्यातील 21 विधानसभा मतदार संघातून 179 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले आहेत. त्यामुळे आत 303 उमेदवार निवडणूक लढणार आहेत. यात सर्वाधिक 24 उमेदवार हे इंदापूर विधानसभा मतदारसंघात आहे तर सर्वात कमी भोर आणि मावळ मतदारसंघातून प्रत्येकी 6 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. विधानसभा आणि उमेदवारांची संख्या पहा –
जुन्नर (11), आंबेगाव (11), खेड आळंदी (13), शिरूर (11), दौंड (14), इंदापूर (24), बारामती (23), पुरंदर (16), भोर (6), मावळ (6), चिंचवड (21), पिंपरी (15), भोसरी (11), वडगाव शेरी (16), शिवाजीनगर (13), कोथरूड (12), खडकवासला (14), पर्वती (15), हडपसर (19), पुणे कॅन्टोन्मेंट (20) आणि कसबा पेठ (12)
बारामतीमध्ये युगेंद्र पवार यांच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे. आज शरद पवार यांच्या बारामतीत सहा सभा आणि मेळावे होत आहेत. बारामतीचा गड राखण्यासाठी शरद पवार यांच्या आज बारामती शहर आणि ग्रामीण भागात एकूण सहा सभा होणार आहेत. बारामतीची निवडणूकही प्रतिष्ठेची ठरली असल्याने या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनीही बारामतीकडे विशेष लक्ष देऊन नातवासाठी ते मैदानात उतरले आहेत. त्या अनुषंगाने शरद पवार यांच्या सभांचे आयोजन करण्यात आले आहे. या सभांना ‘स्वाभिमानी सभा’ असे नाव देण्यात आले आहे यातील चार सभा ग्रामीण भागात तर दोन सभा बारामती शहरात होणार आहेत. त्यामुळे शरद पवार या सभांच्या माध्यमातून काय बोलणार, याकडे पक्षाच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.