देश

सेनाभवनाच्या अंगणातला आमदार, शिंदेंचा कट्टर समर्थक आता राज ठाकरेंच्या मुलाला भिडणार, कोण आहेत सदा सरवणकर?

आगामी विधानसभा निवडणुकीचं (Vidhan Sabha Election 2024) बिगुल वाजलं असून सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. अशातच काही पक्षांनी आपल्या याद्या जाहीर केल्या आहेत. अशातच मनसेनं आपली दुसरी यादी जाहीर केली असून माहीम विधानसभा (Mahim Vidhan Sabha) मतदारसंघातून आणखी एक ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. माहीममधून राज ठाकरेंचे (Raj Thackeray) सुपुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर, शिंदेंच्या शिवसेनेकडून सदा सरवणकरांना (Sada Sarvankar) उमेदवारी देण्यात आली आहे. सदा सरवणकर म्हणजे, शिवसेनेचे प्रबळ नेते आणि ठाकरेंचे विश्वासू… पण शिवसेनेतील फुटीनंतर सरवणकर यांनी शिंदेंची साथ देण्याचा निर्णय घेतला. गेल्या बऱ्याच वर्षापासून माहीम मतदारसंघावर सरवणकर यांनी आपला दबदबा कायम ठेवला आहे. अशातच, प्रबळ, अनुभवी अशा सरवकरांशी निवडणुकीच्या रिंगणात अमित ठाकरेंचा सामना होणार आहे.

आजवर शिवसेनेच्या तिकीटावर एकदाही सदा सरवणकर पराभूत झालेले नाहीत. शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे आमदार सदा सरवणकर यांनी शिवसेनेत अनेक महत्त्वाची पदं भूषवली आहेत. काही दिवसांपूर्वीच सदा सरवणकर सिद्धिविनायक मंदिर न्यास अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ठाकरेंचे विश्वासू समजले जाणारे सदा सरवणकर सध्या शिंदे गटात आहेत. शिंदेंकडून सरवणकर यांना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देखील जाहीर करण्यात आली आहे.

पक्षफुटीनंतर गोळीबार प्रकरणात सरवणकरांचं नाव
साधारणतः दोन वर्षांपूर्वी गणेशोत्सवात प्रभादेवीमध्ये शिवसेनेच्या दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला होता. ठाकरे गट आणि शिंदे गट आमने-सामने आले होते. त्यावेळी हवेत गोळीबार केल्याप्रकरणी सदा सरवणकर अडचणीत सापडले होते. याप्रकरणी चौकशीअंती सदा सरवणकरांना क्लिन चीट देण्यात आली होती. याच राड्यामुळे सदा सरवणकरांची मंत्रिपदाची संधी हुकल्याचं बोललं जात होतं. परिणाम कालांतरानं सदा सरवणकरांच्या गळ्यात मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर न्यास अध्यक्षपदाची माळ घालण्यात आली.

शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे आमदार सदा सरवणकर यांनी शिवसेनेत अनेक महत्त्वाची पदं भूषवलीत. माहीम, दादरचा गड शिवसेनेकडे राखून ठेवण्याचं शिवधनुष्य सदा सरवणकरांनी अनेक वर्ष पेललं आहे. शिवसेनेत असताना सरवणकरांनी विभागप्रमुख, स्थायी समिती अध्यक्ष यांसारखी अनेक महत्त्वाची पदं भूषवलीत. तसेच, सरवणकर सर्वात आधी नगरसेवक म्हणून शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले होते. त्यानंतर सरवणकरांनी शिवसेनेकडूनच आमदारकीची निवडणूक लढवली. शिवसेनेत फूट पडल्यानंतर मात्र ठाकरेंचे विश्वासू अशी ओळख असणाऱ्या सदा सरवणकरांनी ठाकरेंची साथ सोडली आणि एकनाथ शिंदेंची साथ दिली. ठाकरेंच्या विश्वासूंपैकी एक असणारे आमदार सदा सरवणकर ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात सामील झाले.

सदा सरवणकरांची कारकीर्द
आजवर शिवसेनेच्या तिक एकदाही पराभूत न झालेले माहीम मतदारसंघाचे आमदार सदा सरवणकर. काही दिवसांपूर्वीच सदा सरवणकर सिद्धिविनायक मंदिर न्यास अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ठाकरेंचे विश्वासू असलेले सरवणकर सध्या शिंदे गटात आहेत. शिंदे गटाकडून त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देखील जाहीर करण्यात आली आहे.

सुरुवातीला सदा सरवणकरांनी नगरसेवकाची निवडणूक लढवली असून ते 1992 ते 2007 पर्यंत नगरसेवक होते. त्यानंतर 2004 मध्ये ते पहिल्यांदा शिवसेनेच्या तिकीटावर आमदार म्हणून निवडून आले. 2009 मध्ये मात्र सदा सरवणकरांना आमदारकीचं तिकीट नाकारण्यात आलं आणि त्याच्या ऐवजी पक्षाकडून आदेश बांदेकरांना संधी देण्यात आली. त्यावेळी नाराज झालेल्या सदा सरवणकरांनी शिवसेनेची साथ सोडली आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2009 ची विधानसभा निवडणूक सदा सरवणकरांनी काँग्रेसच्या तिकीटावर लढवली. पण, या निवडणुकीत मनसेच्या नितीन सरदेसाईंनी बाजी मारली. त्यानंतर 2012 मध्ये सदा सरवणकरांनी काँग्रेसमधून पुन्हा घरवापसी केली. त्यावेळी माहीम, दादर विधानसभेत शिवसेनेची पकड फारशी मजबूत राहिली नव्हती. पक्षाकडून सदा सरवणकरांवर पक्षबांधणीची जबाबदारी सोपवण्यात आली. सरवणकरांवर विभागप्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यानंतर सर्वात आधी 2014 मध्ये आणि त्यानंतर 2019 मध्ये सदा सरवणकर सलग दोन टर्म आमदार म्हणून निवडून आले.

दरम्यान, आताची परिस्थिती 2019 च्या निवडणुकीपेक्षा वेगळी आहे. गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्रातील अभूतपूर्व सत्तासंघर्षानंतर राज्यातील राजकारण पुरतं बदलून गेलं आहे. आता शिवसेना विभागली असून एक शिंदेंची शिवसेना आणि एक ठाकरेंची शिवसेना झाली आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक चुरशीची असणार आहे. शिंदेंकडून सदा सरवणकर, मनसेकडून राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. पण, अशातच आता ठाकरे कुणाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार? की, सख्या पुतण्याविरोधात उमेदवार देणं टाळणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे आता शिवसेना भवनाच्या अंगणार कोण गुलाल उधळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Related Articles

Back to top button