ठाणे महापालिकेने गुपचूप शहर विकास आराखडा जाहीर केला या संदर्भात काँग्रेस आक्रमक #merabharatsamachar #Congress #vikrantchavhan
ठाणे महापालिकेकडून ठाणे शहराचा पहिला सुधारित विकास आराखडा नुकताच प्रसिध्द करण्यात आला असून नागरिकांच्या हरकती आणि सुचनांसाठी सोमवारी खुला करण्यात आला. गुरूवार ११ ऑक्टोबर रोजी आराखड्याची अधिसूचना काढूनही रविवारपर्यंत आराखडा संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला नव्हता. त्यामुळे आराखडा गुपचूप प्रसिध्द केल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. अखेर सोमवारी महापालिका मुख्यालयामध्ये आणि संकेतस्थळावर हा आराखडा प्रसिध्द करण्यात आला. परंतु बांधकाम व्यवसायिकांच्या हिताचा आराखडा असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
ठाणे नगरपरिषद आणि ३२ महसुली गावांचा समावेश करून १ ऑक्टोबर १९८२ साली ठाणे महापालिकेची स्थापना करण्यात आली. या शहराचा पहिला विकास आराखडा १४ मे २००३ साली लागू करण्यात आला होता. विकास आराखडा अंमलात आल्यापासून वीस वर्षाच्या कालावधीमध्ये त्याची फेरतपासणी आणि सुधारणा बंधनकारक असते. २०२३ मध्ये या आराखड्याला वीस वर्ष पूर्ण झाली असून त्यापुर्वी विकास आराखड्यात सुधारणा करणे महापालिकेस आवश्यक होते. परंतु करोना काळानंतरच्या विलंबानंतर अखेर १० ऑक्टोबर २०२४ रोजी या संदर्भातील अधिसुचना प्रसिध्द करण्यात आली.
सोमवारी हे आराखडे नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली असून त्यावर नागरिकांनी ६० दिवसात सूचना आणि हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे. या योजनेचे नकाशे व अहवाल कामकाजाच्या दिवशी आणि कार्यालयीन वेळेत नागरिकांच्या अवलोकनासाठी विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्याचबरोबर, या प्रारुप विकास योजनेचे नकाशे आणि तपशिलाच्या प्रती योग्य शुल्क आकारून ठाणे महापालिकेच्या मुख्यालयातही उपलब्ध आहेत, असे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
आराखड्यात सुचविण्यात आलेली आरक्षणे…
६२ उद्याने, १ बॉटनिकल गार्डन, ६३ खेळाची मैदाने, ७ क्रीडा संकूल, २४ रिक्रिएशन मैदाने, ४ बहुउद्देशीय मैदाने, १ तरण तलाव व जिमखाने, ७ वॉटरफ्रंट, ४ तिवरांचे वन, १ प्रेक्षागृह, १ नाट्यगृह, १ कन्व्हेंशन सेंटर, १ अर्बन फॉरेस्ट पार्क, १ टाऊन पार्क अशी १७८ आरक्षणे विकास आराखड्यात सुचवण्यात आली आहेत.