देश

पुण्यात हेलिकॉप्टर कोसळलं! तिघांचा मृत्यू; ‘या’ नेत्याला आणण्यासाठी मुंबईत येताना अपघात

पुण्यामधील बावधनजवळ बुधवारी (2 ऑक्टोबर रोजी) सकाळी पावणे सातच्या सुमारा एका हेलिकॉप्टरचा अपघात झाला. दाट धुक्यामुळे बावधनजवळ हे हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मृतांमध्ये दोन पायलेट आणि एका इंजिनिअरचा समावेश आहे.

मुंबईकडे येत होतं हेलिकॉप्टर
सदर हेलिकॉप्टरने ऑक्सफर्ड गोल्फ क्लबच्या हेलिपॅडवरून उड्डाण केलं होतं. हे हेलिकॉप्टर पुण्याहून मुंबईच्या दिशेने येत होतं. मात्र दाट धुक्यामुळे त्याला अपघात झाल्याची प्रथामिक शक्यता व्यक्त केली जात आहे. दुर्घघटनेच्या ठिकाणी हेलिकॉप्टरचे भाग जळत असतानाचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत.

नेमका अपघात कसा झाला?
पुणे शहर आणि परिसरामध्ये सकाळपासूनच दाट धुकं होतं. या धुक्यामुळेच हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांमध्येच हेलिकॉप्टर अपघातग्रस्त झालं. हिंजवडीजवळच्या दरीमध्ये हे हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. पायलेटला धुक्याचा अंदाज आला नाही असं प्राथमिक कारण असलं तरी तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. या ठिकाणी बऱ्याच टेकड्या असल्याने त्याचा अंदाज न आल्यानेही अपघात झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दुर्गम भागात कोसळलं हेलिकॉप्टर
अपघात अगदीच दुर्गम ठिकाणी झाल्याने अपघातानंतर दीड तासांनीही मदत पोहचलेली नाही. या डोंगरमाथ्याच्या मागील बाजूने असलेल्या कच्च्या वाटेने रुग्णावाहिका आणि बचाव पथक घटनास्थळी पोहचण्याचा प्रयत्न करत आहे. अजित पवार गटाचे खासदार सुनिल तटकरेंनी याच हेलिकॉप्टरने काल प्रवास केला होता. त्यांना आणण्यासाठी हे हेलिकॉप्टर पुन्हा जात होतं. त्याचवेळी हा अपघात झाला.

तीनपेक्षा अधिक प्रवासी?
अग्निशामनदलाच्या चार टीम घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमनदलाच्या कर्मचाऱ्यांनी अपघातात मरण पावलेल्यांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. या ठिकाणी मदतकार्य करणाऱ्यांनी तिघांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं असून या हेलिकॉप्टरमध्ये तीनपेक्षा अधिक लोक असतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र हा अपघात नेमका कसा झाला याबद्दलचा तपास आता केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

पुण्याबरोबर मुंबईवरही धुक्याची चादर
पुण्यात आज पहाटेपासूनच दाट धुक्याची चादर होती. त्यामुळेच हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. पुण्याबरोबरच मुंबईवरही आज सकाळपासूनच दाट धुक्याची चादर असून अगदी सकाळी दहा वाजेपर्यंतही धुक्याची चादर सरलेली नाही.

Related Articles

Back to top button