ट्रकमधून तब्बल 1600 iPhone लंपास; 12 कोटींचा मुद्देमाल चोरीला, IG स्वत: पोलीस ठाण्यात पोहोचले, पुढे काय झालं?
मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील लुटीचं एक प्रकरण समोर आलं आहे. लखनादौन-झाशी हायवेवर एका कंटेनर ड्रायव्हरचे हात-पाय बांधून कंटनेरमध्ये ठेवण्यात आलले 12 कोटी किंमतीचे आयफोन लुटण्यात आले. ड्रायव्हर रिपोर्ट लिहिण्यासाठी वारंवार बांदरी पोलीस ठाण्यात फेऱ्या मारत होता. पण 15 दिवसांनंतही पोलीस रिपोर्ट लिहिण्यास तयार नव्हते. अखेर हे प्रकरण पोलीस महानिरीक्षकांकडे पोहोचलं. ते स्वत: गुरुवारी रात्री पोलीस ठाण्यात दाखल झाले आणि संपूर्ण घटनेची माहिती घेतली. एफआयआऱ दाखल करुन घेण्यात विलंब केल्याने ठाणे प्रभारी भागचंद उइके, एएसआय राजेंद्र पांडे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. तसंच हेड कॉन्स्टेबल राजेश पांडे यांचं निलंबन करण्यात आलं आहे.
14 ऑगस्टला अॅप्पलचे मोबाईल घेऊन एक कंटेनर (UP 14 PT 0103) हैदराबादहून दिल्लीसाठी निघाला होता. कंटनेर ड्रायव्हरसह एक सुरक्षारक्षकही सोबत होता. लखनादौन येथे दुसरा सुरक्षारक्षक कंटेनरमध्ये येणार होता. लखनौदान येथे कंटेनरमध्ये असणाऱ्या सुरक्षारक्षकाने चहा पिण्यासाठी कंटेनर थांबवला. यावेळी त्याने आधीच उपस्थित एका व्यक्तीची चालकाशी भेट करुन दिली आणि हा सुरक्षारक्षक असून आपल्यासोबत येईल असं सांगितलं.
यानंतर दोन्ही सुरक्षारक्षकांसोबत ट्रक ड्रायव्हर रवाना झाला. ट्रक ड्रायव्हरने झोप आल्यानंतर कंटनेर रस्त्याशेजारी उभा केला आणि तिथेच झोपला. सोबत दोन्ही सुरक्षारक्षकही झोपले. दुसऱ्या दिवशी 15 ऑगस्टला ड्रायव्हरला जाग आली तेव्हा तो बांदरी येथे होता. त्याचे हात-पाय आणि तोंड बांधलेलं होतं.
चालकाने कशीबशी स्वत:ची सुटका करुन घेतली. त्याने मागे जाऊन पाहिलं असता कंटनेरचा गेट उघडा होता आणि सर्व मोबाईल गायब होते. कंटनेरमधील दोन्ही सुरक्षारक्षकही बेपत्ता होते. कंटेनरमधील अर्ध्यापेक्षा जास्त मोबाईल चोरीला गेल्याची शंका आहे. जवळपास 1600 मोबाईल घेऊन ते फरार झाले.
कंटनेर चालकाने यानंतर तात्काळ बांदरी पोलीस स्टेशन गाठलं, पण पोलिसांनी फार गांभीर्याने घेतलं नाही. पोलीस महानिरीक्षक प्रमोद वर्मा यांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर ते बांदरी पोलीस ठाण्यात पोहोचले. सर्व माहिती घेतल्यानंतर त्यांनी बेजबाबदापणे वागणाऱ्या पोलिसांवर कारवाईचे आदेश दिले.
सागर रेंजचे आयजी प्रमोद वर्मा यांनी सांगितलं की, जवळपास 1600 मोबाईल चोरी झाले आहेत. 5 पथकं गठीत करण्यात आली आहेत. टोलनाके आणि इतर ठिकाणी तपास केला जात आहे. पोलिसांनी हायवेवर टोकनाक्यांवरील सीसीटीव्हीदेखील तपासत आहेत. पोलीस अॅप्पल कंपनीचे अधिकारी, ट्रान्सपोर्ट कंपनी आणि सुरक्षारक्षकांसह इतरांची चौकशी करत आहेत. प्रत्येक बाजूने पोलीस तपास करत आहेत.