कल्याण-नगर हायवेवर भीषण अपघात! अत्यंस्कारावरुन परतणाऱ्या 5 जणांचा मृत्यू
कल्याण-अहमदनगर महामार्गावर झालेल्या भीषण अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. आज (19 जुलै रोजी) सकाळच्या सुमारास हा अपघात घडला. गुळुंचवाडी येथे भरधाव ट्रकने अनेकांना धडक दिली. या ट्रकने 3 दुचाकी स्वारांना चिरडलं. या अपघातात पाच जण मरण पावले असून अनेकजण जखमी झालेत.
नक्की घडलं काय?
महामार्गावर असलेल्या गुळुंचवाडी गावामध्ये अत्यंविधीच्या कार्यक्रमावर परतत असणाऱ्या गावकऱ्यांना या ट्रकने उडवल्याने एकच गोंधळ उडाला. प्राथमिक माहितीनुसार या अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. अत्यंविधी उकरून हे नागरिक घरी जात असताना भरधाव ट्रकने अनेक दुचाकी तसेच चारचाकी गाड्यांना धडक दिली. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 222 वर ट्रक चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे.
पोलिसांची घटनास्थळी धाव; गावकरी रस्त्यावर
अपघाताचे वृत्त समजताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आपल्या गावातील पाच जणांचा या भीषण अपघातात मृत्यू झाल्याचं समजताच शेकडोच्या संख्येनं गावकरी महामार्गावर उतरले. पोलिसांबरोबर चर्चा केल्यानंतर रस्ता रिकामा करुन देण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केल्याची माहिती प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. मात्र अत्यंविधीवरुन परत जाताना गावातील पाच जणांवर काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
काही महिन्यांपूर्वीही झालेला विचित्र अपघात
काही महिन्यांपूर्वीच याच महामार्गावर असाच एक विचित्र अपघात झाला होता. डिंगोरे गावच्या हद्दीत झालेल्या या अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू झाला होता. या अपघातामध्ये ट्रक, पिकअप आणि रिक्षा यांची धडक झाली होती. पिकअप नगरकडून कल्याणच्या दिशेने जात होती तर रिक्षा कल्याणकडून नगरच्या दिशेने जात होती तर ट्रकदेखील कल्याणकडून नगरच्या दिशेने जात असताना या तिनही वाहनांची समोरा-समोर जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की सर्व वाहनांचा चक्काचुर झाला होता. या अपघातात पिकअपमधील एकाच कुटूंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला होता. या 8 मृतांमध्ये 4 वर्षाच्या मुलाचा आणि 6 वर्षाच्या मुलीचाही समावेश होता. रिक्षामधील 4 प्रवाशांचा ही जागीच मृत्यू झालेला. पिकअपमधील चारही मृत्य हे जुन्नर तालुक्यातील मढ पारगावचे रहिवाशी होते, असं पोलिसांनी सांगितलं होतं. आजच्या अपघाताने या अपघाच्या आठवणी ताज्या झाल्याची चर्चा पंचक्रोषीत आहे.