छगन भुजबळ पोहोचले शरद पवारांच्या भेटीला; अर्धा तास बैठक, राजकीय वर्तुळात खळबळ
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले आहेत. भुजबळ सिल्व्हर ओकवरुन पवारांच्या भेटीसाठी पोहोचल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भुजबळ यांच्या भेटीमागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. या भेटीबद्दल बरीच गुप्तता पाळण्यात आलेली होती.
कालच बारामतीत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीर कार्यक्रमात भुजबळांनी शरद पवारांवर तोफ डागली होती. आरक्षणाचा विषय निकाली काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला शरद पवारांनी उपस्थित राहणं अपेक्षित होतं. विरोधी पक्षातील नेते या बैठकीला येणार होते. पण संध्याकाळी ५ वाजता बारामतीमधून फोन गेला. त्यानंतर सगळ्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला, असं म्हणत भुजबळांनी शरद पवारांवर अप्रत्यक्षपणे टीका केली.
अजित पवार, शरद पवार गटांचं म्हणणं काय?
शरद पवार आमच्यासाठी आदरणीय आहेत. आम्ही सगळेच त्यांचा आदर करतो. छगन भुजबळांना शरद पवारांची भेट घेण्यासाठी कोणाच्याही परवानगीची गरज नाही, असं अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील म्हणाले. भुजबळ आणि शरद पवारांच्या बैठकीबद्दल भुजबळच सांगू शकतील, असं शरद पवार गटाच्या नेत्या वंदना चव्हाण म्हणाल्या. शरद पवारांवर कोणीही उठून टीका करतं. पण त्यामुळे पवार साहेब त्यांना भेटत नाही असं होत नाही. पवार साहेब नेते, कार्यकर्त्यांना भेटत असतात. आता ते स्वगृही परतणार का, याबद्दलचा निर्णय शरद पवारच घेतील, असं चव्हाण यांनी सांगितलं.