उद्घाटनानंतर वर्षभरातच समृद्धी महामार्गावर भेगा, MSRDCचा ‘तो’ दावा फोल!
नागपूर- मुंबई समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करून अवघं एक वर्ष झालं तोच या महामार्गाला मोठ्या भेगा पडल्याचे समोर आले आहे. छत्रपती संभाजीनगरपासून जवळच असलेल्या माळीवाडा इंटरचेंजजवळ ३ सेंमी रुंदीच्या ५० फूट लांबीच्या भेगा पडल्या आहेत. समृद्धी महामार्गावर भेगा पडल्याचे फोटो व व्हिडिओदेखील समोर आले आहेत.
समृद्धी महामार्गासाठी एम-४० ग्रेडचं सिमेंट वापरल्यास २० वर्षे खड्डे पडत नसल्याचा दावा MSRDCने केला होता. मात्र, एका वर्षातच समृद्धीवर भेगा पडल्याने एमएसआरडीसीचा हा दावा फोल ठरला आहे. माळीवाडा इंटरचेंजजवळच पुलावर मोठ मोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. महामार्गाची वर्षभरातच अशी दुरवस्था झालीय तर पुढे काय होणार असा प्रश्न वाहतूक चालकांना पडला आहे.
महाराष्ट्राचा ड्रिम प्रोजेक्ट म्हणून समृद्धी महामार्गाकडे पाहिलं जातं. मात्र या महामार्गाचे उद्घाटन होऊन एक वर्षही पूर्ण झालेले नाहीये. समृद्धी महामार्ग अद्याप मुंबईपर्यंत सुरूदेखील झाला नाहीये. तरीदेखील महामार्गावर भेगा पडल्याचे दिसतंय. माळीवाडा एक्सचेंजजवळ मोठ मोठ्या भेगा पडल्या आहेत. तसंच, काही खड्डेदेखील पडले आहेत. त्यामुळं अपघात होऊ शकतात. येथील स्थानिक ग्रामस्थांनी चार दिवसांपूर्वीच प्रशासनाकडे तक्रार केली होती. मात्र, तसं असूनही अद्याप दखल घेण्यात आलेली नाही, अशी माहिती कळतेय.
समृद्ध महामार्ग लवकरच पूर्णपणे खुला होणार
समृद्धी महामार्ग एकूण 701 किमी पैकी 625 किमी लांबीचा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला आहे. तर, समृद्धी महामार्गाच्या उर्वरित मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. ऑगस्ट महिन्यापर्यंत हा संपूर्ण समृद्धी महामार्ग प्रवाशांसाठी खुले करण्यात येणार आहे. लवकरच 76 किलोमीटरचा टप्पा खुला करण्यात येईल. 2024 पर्यंत समृद्धी महामार्ग खुला होणार आहे. मुंबई ते नागपूर हे अंतर कापण्यासाठी 16-20 तास लागत होते. मात्र, समृद्धी महामार्गामुळं हे अंतर 7-8 तासांत पूर्ण होणार आहे.