२४ तासापासून बंद असलेली कोकण रेल्वेची वाहतूक कधीपर्यंत सुरू होणार? प्रशासनाने दिली मोठी अपडेट
जवळ जवळ गेल्या २४ तासांपासून ठप्प असलेली कोकण रेल्वेची वाहतूक कधी सुरू होणार याबाबत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. काल मंगळवारी महाराष्ट्रातील मडुरे आणि गोव्यातील पेडणे या रेल्वे स्थानकादरम्यान रुळावर चिखल आणि पाणी आल्याने रेल्वेची वाहतूक बंद झाली होती. आता कोकण रेल्वेचे अध्यक्ष संतोष कुमार झा यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
कोकण रेल्वे मार्गावरअतिवृष्टीमुळे मंगळवारी पेरनेम (पेडणे) बोगद्यात रुळांवर चिखल आणि पाणी आल्याने वाहतूक संध्याकाळी ५ वाजल्यापासून बंद होती. त्यानंतर रात्री उशीरा ही वाहतूक वेगमर्यादेसह पुन्हा सुरू करण्यात आली. मात्र मध्यरात्री ३ वाजता ही वाहतूक पुन्हा बंद करण्यात आली. यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होती. प्रवाशांना याचा मोठा फटका बसला.
दरम्यान, पेरनेम बोगद्यात रुळांवर आलेला चिखल आणि पाणी काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. याबाबत बोलताना कोकण रेल्वेचे अध्यक्ष संतोष कुमार झा म्हणाले, या बोगद्यातील चिखल-पाणी काढण्यासाठी १००हून अधिक कामगार काम करत आहेत. त्यांचे २० ते २५ सुपरव्हायझर तसेच कोकण रेल्वेचे मुख्य अभियंता दर्जेचे अधिकारी यावर काम करत आहेत. याशिवाय बोगद्या संदर्भातील काही तज्ञ लोक देखील उपस्थित आहेत.
याबाबत कोकण रेल्वेचे बोगद्या संदर्भातील काही आंतरराष्ट्रीय सल्लागार आहेत ते थोड्यावेळात घटनास्थळी दाखल होतील. आम्ही सर्वजण मिळून बोगद्यात जे पाणी जमिनी खालून येत आहे ते थांबवण्यात पूर्णपणे प्रयत्न करू आणि त्यानंतर रात्री ८ वाजेपर्यंत कोकण रेल्वेची वाहतूक पूर्ववत होईल, असा विश्वास झा यांनी व्यक्त केला.
कोकणकन्या आज सावंतवाडी येथून सुटणार
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील गोवा हद्दीतील पेडणे दरम्यान असलेल्या टनेलमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी जमा झाल्याने कोकण रेल्वेची जणू ठप्प झाली आहे. दरम्यान आज 10 जुलै रोजी मुंबई कडे जाणारी मडगाव येथून सुटणारी मडगाव ते मुंबई सीएसएमटी (20112) ही कोकण कन्या एक्सप्रेस सावंतवाडी रोड स्थानकातून सोडण्याचा महत्त्वाचा निर्णय कोकण रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. जवळपास 25 ते 30 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत यामध्ये लांब पल्ल्यांच्या गाड्यांचाही समावेश आहे. काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. त्यामुळे आज 10 जुलै रोजी मडगाव येथून मुंबईसाठी सुटणारी कोकण कन्या एक्सप्रेस सायंकाळी 7 वाजून 32 मिनिटांनी म्हणजे तिच्या सावंतवाडीच्या नेहमीच्या वेळेनुसार मुंबई करता आपला प्रवास सुरू करणार आहे. मडगाव ते सावंतवाडी रोड दरम्यान या बुधवारची कोकणकन्या एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.