अजितदादा सिद्धिविनायक चरणी, बाप्पाच्या आशीर्वादाची खात्री, व्हिक्टरीची खूण चर्चेचा विषय
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्यासह पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे आणि सर्व मंत्री, आमदार यांनी मुंबईत श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. चांगल्या कामाची सुरुवात प्रत्येक जण देवदर्शनाने करत असतो, त्याप्रमाणे आपणही सिद्धिविनायकाच्या चरणी दर्शनाला आलो, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली. विशेष म्हणजे दर्शनानंतर अजितदादा, तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी दोन बोटांनी दाखवलेली ‘विजयाची’ खूण अर्थात व्हिक्टरी साईन सर्वत्र चर्चेचा विषय ठरली होती. पत्रकारांनी त्यावरुन प्रश्न विचारले असता अजित पवार यांनी आगामी निवडणुकांकडे रोख वळवला.
अजित पवार काय म्हणाले?
आजच्या दिवशी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. काल पावसाळी अधिवेशनात विधिमंडळाचं कामकाज तहकूब होतं, आता विधानसभेत जाऊन कालची-आजची कामं उरकायची आहेत. चांगल्या कामाची सुरुवात प्रत्येक जण देवदर्शनाने करत असतो. कुणी पांडुरंगाच्या दर्शनाला जातं, आज आम्ही मुंबईत असल्यामुळे राष्ट्रवादीतील सगळे सहकारी, लोकप्रतिनिधी सिद्धिविनायकाचे दर्शन घेण्यासाठी आलो होतो. व्यवस्थित दर्शन झालं आणि आता आपापल्या कामाला जाणार आहोत, असं अजित पवार म्हणाले.
विजयाच्या खुणेचा अर्थ काय?
विजयाची खूण दाखवली, त्याचा अर्थ आता आम्ही जे काही जनतेच्या समोर जाणार आहोत, त्यात जनतेने आशीर्वाद द्यावे, सिद्धिविनायकाने आशीर्वाद द्यावेत यासाठी व्हिक्टरीची खूण दाखवली. शेवटी जनता जनार्दन सर्व असते. तो मतदार राजा आहे. आम्ही लोकांचा विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी त्यांच्यासमोर जाणार आहोत. सगळ्या गोष्टीची सुरुवात चांगल्या दिवशी केली जाते, आज नेमका तो योग जुळून आला आहे. म्हणून आजचा दिवस निवडला, असं अजित पवार म्हणाले.
बाप्पा नक्की आम्हाला आशीर्वाद देईल
आजचा दिवस चांगला होता, आज मंगळवार आहे, सिद्धिविनायकाचा.. गणरायाचा दिवस आहे. लोकप्रतिनिधींसोबत चांगलं दर्शन झालं, आता विधिमंडळात जाणार. बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी सगळे जण येत असतात, इथेही खूप गर्दी आहे. तसे आम्हीही आशीर्वाद मागितले, बाप्पा नक्की आम्हाला आशीर्वाद देईल, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.