देश

वाशी-सीएसएमटी लोकल सेवा ठप्प, मध्य रेल्वेचा फास्ट ट्रॅकही बंद, जाणून घ्या मुंबईच्या लाईफलाईनचे Latest Updates

 मुंबई आणि मुंबई उपनगरात रात्रीपासूनच जोरदार पाऊस (Heavy Rain In Mumbai) कोसळत आहे. यामुळे मुंबईच्या अनेक सकळ भागात पाणी साचल्याच पाहायला मिळत आहे. मुसळधार पावसाचा परिणाम मुंबईतील लोकल सेवेवर (Mumbai Local Train) देखील झाला आहे.

पावसामुळे हार्बर रेल्वे लाईन विस्कळीत झाली आहे. सध्या पनवेल ते वाशी मार्ग सुरु आहे. तर वाशीपासून सीएसएमटीला येणारी लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. मुंबईला येण्याासठी वाशी ते ठाणे आणि ठाणे ते मुंबई असा लोकांचा प्रवास सुरु आहे. चुनाभट्टी स्थानकात पाणी अजूनही असल्याने सीएसएमटी ते वाशी लोकल रद्द आहेत. तर ट्रान्स हार्बर लाईन पंधरा मिनिटे उशिराने सुरु आहे.

मध्य रेल्वेवर काय परिस्थिती?

सीएसएमटी ते ठाणे दरम्यान जलद मार्गिका बंद असल्याने धीम्या मार्गिकेवर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकल एकापाठोपाठ रुळांवर उभ्या आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेवरील स्थानकांवर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे दिसून येत आहे. तर पश्चिम रेल्वेवरील लोकल 15 ते 20 मिनिटं उशीराने धावत आहे.

मुंबईतील अनेक भागात साचलं पाणी-

दक्षिण मुंबईतील सायन, हिंदमाता, परळ या भागांमध्ये पाणी साचले आहे. तसेच उपनगरात असल्फा, साकीनाका, जेबी नगर, विक्रोळी, घाटकोपर, चकाला, अंधेरी या परिसरातही सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. सध्या साचलेल्या पाण्यातून गाड्यांना मार्ग काढता येत आहे. मात्र, वाहतुकीचा वेग मंदावल्याने रस्त्यांवर ट्रॅफिक जॅम होण्यास सुरुवात झाली आहे. पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहिल्यास मुंबईतील रस्त्यांवर पाणी साचून चक्काजाम होण्याची दाट शक्यता आहे. ठाण्यातही आज पहाटेपासून जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे रस्त्यांवर पाणी साचले आहे.

मुंबईतील शाळांना सुट्टी-

आज दिवसभर देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगरातील सर्व महानगरपालिका, शासकीय आणि खासगी माध्यमांच्या शाळांना तसेच महाविद्यालयांच्या पहिल्या सत्रासाठी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील सत्रांसाठीचा निर्णय जाहीर करण्यात येणार आहे. पहिल्या (सकाळच्या )सत्रातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. पावसाच्या परीक्षेचा आढावा घेऊन दुसऱ्या सत्रातील म्हणजे दुपारच्या सत्रातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी द्यायची की नाही या संदर्भात निर्णय घेतला जाईल, असं मुंबई महानगरपालिका प्रशासनकडून सांगण्यात येत आहे.

Related Articles

Back to top button