देश

Zika Virus: पुण्यात झिकाचा धोका वाढला, एरंडवणेतील गर्भवती महिलेला झिकाचा संसर्ग

पुण्यात (Pune News) झिका व्हायरसचा  (Zika Virus) प्रादुर्भाव दिवसेंदिस वाढत आहे.पुण्यातील एरंडवणे परिसरातील एका गर्भवती महिलेला झिकाचा संसर्ग झाला आहे.  त्यामुळे  पुणे शहरातील झिकाची एकूण रुग्णसंख्या पाचवर गेली आहे.  गर्भवती महिलेला संसर्ग झाल्याने तिच्या बाळामध्ये विकृती निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. तसेच, पालखीच्या पार्शवभूमीवर शहरात झिका संसर्ग वाढण्याचा धोकाही निर्माण झाला आहे.

पुणे  महापालिकेच्या हद्दीत एरंडवणेत 21 जून रोजी दोन झिकाचे रुग्ण सापडले. यामध्ये 46 वर्षांचा डॉक्टर आणि त्याच्या 15 वर्षाच्या मुलीला झिकाचे निदान झाले. त्यानंतर मुंढवा येथे 47 वर्षांची एक महिला आणि तिच्या 22 वर्षांच्या मुलालाही झिकाचे निदान झाले. आता एरंडवणेतील गणेशनगर येथील 28 वर्षीय गर्भवतीला लागण झाली आहे. झिका जीवघेणा आजार नाही. ताप, डोकेदुखी, अंगावर पुरळ, सांधेदुखी अशी लक्षणे दिसून येतात आणि उपचारांनी ती जातात, परंतु त्याचा खरा धोका गर्भवती महिलांच्या बाळांना जास्त आहे.

झिका विषाणूचा गर्भावर काय परिणाम होतो? 

आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार, झिका व्हायरस टाळण्यासाठी गरोदर स्त्रियांनी काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण याचा सर्वाधिक धोका गर्भावर होतो. त्यामुळे गरोदरपणात जर झिका विषाणूचा संसर्ग झाल्यास, बाळाचा मेंदू सामान्यपणे वाढू शकत नाही आणि विकसित होऊ शकत नाही. परिणामी, बाळाचा जन्म मेंदूच्या विकासाशी संबंधित अपंगत्व घेऊन होऊ शकतो, किंवा त्याचे डोके लहान असू शकते, तसेच बाळामध्ये ऐकणे, शिकणे आणि वागण्यात देखील समस्या असू शकतात. पहिल्या तिमाहीत झिका संसर्ग झाल्यानंतर या समस्यांचा धोका सर्वाधिक असतो. झिका विषाणूचा गर्भधारणेचे प्रमाण घटण्याशी देखील संबंध आहे, असे डॉ. कल्पना बळीवंत म्हणल्या.

रक्ताचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेकडे पाठवण्यात आले 

गर्भवती महिलेची प्रकृती स्थिर आहे. रुग्णांच्या संपर्कात आलेले आणि तापाची लक्षणे असलेले त्यांचे कुटुंबीय आणि इतर व्यक्तींचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेकडे पाठवण्यात आला आहे.  झिकाचे रुग्ण आढळून आलेल्या परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु आहेत .  पुण्यातील एरंडवणे आणि मुंढव्यात रुग्ण आढळलेल्या परिसरात प्रत्येकी 100  घरांच्या आतमध्ये धूर फवारणी करण्यात आली आहे.

Related Articles

Back to top button