पत्नी आणि 2 मुलांना टेस्ला कारमध्ये बसवून कार कड्यावरुन थेट पॅसिफिक समुद्रात बुडवली; 1 वर्षांनी समोर आलं खरं कारण
कॅलिफोर्नियामधील एका डोंगरावरुन पत्नी आणि दोन मुलांना पॅसिफिक महासागरात बुडवणाऱ्या भारतीय वंशाच्या रेडिओलॉजिस्ट धर्मेश पटेल याची तुरुंगवासाची शिक्षा टळली आहे. त्याचं मानसिक आरोग्य योग्य नसल्याचा दावा डॉक्टरांनी न्यायालयात केला आहे. जानेवारी 2023 मध्ये धर्मेश पटेलने पत्नी नेहा आणि दोन मुलांना घेऊन जाणारी टेस्ला कार 250 फूट खोल दरीत नेऊन पाडली होती.
250 फूट खोल दरीत कोसळल्यानंतर कारचा चुराडा झाला होता. पण सुदैवाने कुटुंबाला फक्त काहीशी दुखापत झाली होती. त्याच्या पत्नीने सांगितलं आहे की, त्याने कार जाणूनबुजून कड्यावरून खाली पाडली. त्यावेळी तो मानसिकरित्या अस्वस्थ होता.
कार दरीत का पाडली?
गुरुवारी धर्मेश पटेलच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं की, त्याच्या मानसिक स्थितीमुळेच त्याने हे कृत्य केलं आहे. तो पॅरानोईया आणि भ्रमाने ग्रस्त आहे. धर्मेश पटेलची तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी कोर्टात सांगितलं की, या भीषण अपघाताच्या काही आठवड्यांपूर्वी त्याचं मानसिक आरोग्य बिघडलं होतं. त्याला पावलांचे आवाज ऐकू येत होते आणि त्याचा कोणीतरी पाठलाग करत असल्याची खात्री त्याला पटली.
आपल्या मुलांचे अपहरण आणि लैंगिक अत्याचार किंवा तस्करी होण्याचा धोका आहे असाही त्याचा विश्वास पटला होता. धर्मेश पटेलने हत्येचा प्रयत्न केल्याच्या तीन आरोपांमध्ये दोषी नसल्याची कबुली दिली होती, त्याला आता स्किझोएफेक्टिव्ह डिसऑर्डर आणि मेजर डिप्रेशन डिसऑर्डरचे निदान झालं आहे. मानसशास्त्रज्ञाने कोर्टात सांगितलं की, “नसलेला धोका आहे असं समजून त्याने भ्रमाच्या स्थितीत कुटुंबाला वाचवण्यासाठी हे कृत् केलं होतं”.
धर्मेश पटेल याचं मानसिक आरोग्य ठीक नसून ते योग्य व्हावं यासाठी तो पात्र असल्याचं न्यायाधीशांनी म्हटलं आहे. म्हणजेच कायद्यातील तरतूद जी मानसिक आजार असलेल्या आरोपीला तुरुंगवास भोगण्याऐवजी मानसिक आरोग्य उपचार घेण्याची परवानगी देते. कारण या आजाराने गुन्ह्यात मोठी भूमिका बजावलेली असते.
सुपीरियर कोर्टाचे न्यायाधीश सुसान एम. जाकुबोव्स्की यांनी धर्मेश पटेल डॉक्टरांकडून उपचार घेण्यास पात्र असल्याचं सांगितलं. त्याला कॅलिफोर्नियातील त्यांच्या पालकांकडे सोडण्याचा आदेश दिला. त्याच्यावर जीपीएसद्वारे नजर ठेवली जाईल आणि आठवड्यातून एकदा कोर्टात हजेरी लावावी लागणार आहे. त्याला देशाबाहेर प्रवास करण्याची देखील परवानगी नाही आणि त्याने त्याचा ड्रायव्हिंग लायसन्स आणि पासपोर्ट जमा करणे आवश्यक आहे. त्याला आता दोन वर्षांच्या उपचार योजनेवर ठेवण्यात येईल आणि उपचारादरम्यान त्याने कोणताही गुन्हा केला नाही तर त्याच्यावरील आरोप वगळले जातील.