देश

Nilesh Lanke: आय निलेश ज्ञानदेव लंके…. निलेश लंकेंनी फाडफाड इंग्रजीत घेतली खासदारकीची शपथ

अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांनी मंगळवारी लोकसभेत खासदारकीची(LokSabha MP Oath)  शपथ घेतली. महाराष्ट्राच्या इतर खासदारांकडून मराठी भाषेत शपथ घेतली जात असताना निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी इंग्रजीत घेतलेली शपथ चर्चेचा विषय ठरलेली. निलेश लंके यांनी इंग्रजी भाषेत घेतलेल्या या शपथेमुळे अहमदनगर लोकसभेतील राजकारणाचे एक वर्तुळ पूर्ण झाले, असे म्हणावे लागेल.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील लक्षवेधी लढतींपैकी एक ठरलेल्या अहमदनगर मतदारसंघात शरद पवार गटाच्या निलेश लंके यांनी  भाजपच्या सुजय विखे यांचा पराभव केला होता. पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात विखे-पाटील घराण्याचे नाव मोठे असल्याने सुजय विखेंचा पराभव करुन निलेश लंके हे एका अर्थाने जायंट किलर ठरले होते. अहमदनगर लोकसभा निवडणुकीचा प्रचारही राज्यभरात चर्चेचा विषय ठरला होता. लोकसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या काळात सुजय विखे पाटील यांनी निलेश लंके यांना इंग्रजी भाषेवरुन हिणवले होते.

मी जेवढी इंग्रजी बोलतो तेवढी इंग्रजी समोरच्या उमेदवाराने पाठ करून जरी बोलून दाखवली तरी मी उमेदवारी अर्ज  भरणार नाही, असे सुजय विखे पाटील यांनी म्हटले होते. अहमदनगर शहरातील राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात सुजय विखे बोलत होते. मेळाव्याच्या सुरुवातीला सुजय विखेंनी संसदेत इंग्रजीत केलेल्या भाषणाचा एक व्हिडीओ दाखवण्यात आला. याचा आधार घेत सुजय विखेंनी निलेश लंकेंनी इंग्रजी बोलण्याचं आव्हान दिलं. महिनाभरात जरी त्यांनी हे इंग्रजीतील भाषण पाठ करून म्हणून दाखवावं, असे सुजय विखेंनी म्हटले होते. सुजय विखे यांच्या या वक्तव्याचे राजकीय वर्तुळात मोठे पडसाद उमटले होते. मात्र, निलेश लंके यांनी सुजय विखे यांचे आव्हान स्वीकारले होते. इंग्रजी ही केवळ एक भाषा आहे. ती शिकायची म्हटल्यास त्यामध्ये काय अवघड आहे, असे प्रत्युतर निलेश लंके यांनी दिले होते. मात्र, आता संसदेत इंग्रजी भाषेत खासदारकीची शपथ घेऊन निलेश लंके यांनी विखे-पाटील यांना एकप्रकारे उत्तर दिले आहे.

Related Articles

Back to top button