रामायणावर आधारित नाटकामुळे IIT मुंबईच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 1 लाख 20 हजारांचा दंड; तक्रारीत काय म्हटलंय पाहा
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मुंबईने रामायणाचे विडंबन मानले जाणारे ‘राहोवन’ हे वादग्रस्त नाटक सादर केल्याबद्दल आठ विद्यार्थ्यांवर कारवाई केली आहे. विद्यार्थ्यांनी 31 मार्च रोजी संस्थेच्या परफॉर्मिंग आर्ट्स फेस्टिव्हल (PAF) दरम्यान हे नाटक सादर केलं होतं. काही विद्यार्थ्यांनी या नाटकाविरोधात तक्रार दाखल केली होती. हे नाटक हिंदू महाकाव्य रामायणावर (Ramayana) आधारित असून त्यात हिंदू श्रद्धा आणि देवतांचा अपमानजनक संदर्भ असल्याचं विद्यार्थ्यांनी तक्रारीत सांगितलं होतं.
नाटकात मुख्य पात्रांना योग्यप्रकारे सादर करण्यात आलं नसून “स्त्रीवादाचा प्रचार” करण्याच्या नावाखाली सांस्कृतिक मूल्यांची खिल्ली उडवली असंही तक्रारीत सांगण्यात आलं होतं. तक्रारीची दखल घेत 8 मे रोजी शिस्तपालन समितीची बैठक झाली. या बैठकीनंतर 4 जून रोजी संबंधित विद्यार्थ्यांना शिक्षा जाही करत दंड ठोठावण्यात आला.
संस्थेने चार विद्यार्थ्यांना 1 लाख 20 हजारांचा दंड ठोठावला आहे. जवळपास एका सेमिस्टरची इतकी फी आहे. तर इतर चार विद्यार्थ्यांना 40 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. पदवीधर विद्यार्थ्यांना अतिरिक्त शिक्षा देण्यात आली आहे. ज्यानुसार, विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या संस्थेच्या जिमखाना पुरस्कारांवरील बंदीचा समावेश आहे. कनिष्ठ विद्यार्थ्यांना वसतिगृहाच्या सुविधांपासून वंचित राहावं लागणार आहे.
20 जुलै 2024 पर्यंत विद्यार्थ्यांना डीनच्या कार्यालयात दंड भरावा लागणार आहे. जर संबंधित विद्यार्थी दंड भरण्यात अपयशी ठरल्यास त्यांना पुढील कारवाईला सामोरं जावं लागू शकतं असा इशारा देण्यात आला आहे.
‘आयआयटी बी फॉर भारत’ समूहाने 8 एप्रिल रोजी सोशल मीडियावरुन नाटकात भगवान राम आणि रामायण यांची थट्टा केल्याचं सांगितल्यानंतर वादाला तोंड फुटलं होतं. विद्यार्थ्यांनी देवतांची खिल्ली उडवण्यासाठी शैक्षणिक स्वातंत्र्याचा गैरवापर केल्याचा आरोप करत व्हिडीओ पोस्ट करण्यात आले होते. यानंतर रामायणामधील पात्रांवरुन प्रेरित झालेल्या नाटकातील व्हिडीओ व्हायरल झाले होते. यामध्ये सीतेची भूमिका करणाऱ्या कलाकाराने आपल्या अपहरणकर्त्याचं आणि ज्या ठिकाणी नेलं त्या जागेचं कौतुक करताना दाखवण्यात आलं होतं.
“रामायणाचे अवमानकारक चित्रण करणाऱ्या ‘राहोवन’ नाटकात सहभागी असलेल्यांवर आयआयटी मुंबई प्रशासनाने केलेल्या शिस्तभंगाच्या कारवाईचे आम्ही स्वागत करतो,” असं समूहाने एक्सवर म्हटलं आहे. “आम्ही प्रशासनाला मार्गदर्शक तत्त्वे स्थापित करण्याची विनंती करतो. कॅम्पसमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कोणत्याही धर्माची विटंबना होणार नाही याची खात्री करा,” असंही सांगण्यात आलं आहे.
दरम्यान एकीकडे काहीजण कारवाईचं कौतुक करत असताना दुसरीकडे काहीजण मात्र हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला असल्याचा दावा करत आहेत. “शैक्षणिक संस्था सर्वात सुरक्षित असल्याचं मी नेहमी ऐकत आलो आहे. आपलं मत व्यक्त करण्यासाठी सुरक्षित जागा. अरेरे, आयआयटी देखील आता सुरक्षित जागा नाही,” असं एका युजरने म्हटलं आहे.