डोंबिवली नगरीच्या लौकिकात नवी भर, वाहतूक कोंडीमुळे चक्क शाळेला सुट्टी देण्याची वेळ
कल्याण (Kalyan News) शीळ रोडवर मेट्रोच्या (Metro) कामामुळे वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे . या वाहतूक कोंडीत विद्यार्थ्यांची ने आण करणाऱ्या शाळांच्या बसेस देखील अडकल्याने शाळांचे वेळापत्रक कोलमडले आहे. कल्याण शीळ रोड मानपाडा येथील विद्यानिकेतन शाळेच्या बसेस वाहतूक कोंडीत अडकल्याने दुपारच्या सत्रातील विद्यार्थ्यांना सुटी देण्यात आली. मेट्रोचे काम सुरू असल्याने या रस्त्यावर वाहतूक कोंडी होते मात्र वाहतूक पोलिसांच्या नियोजन नसल्याने या रस्त्यावर वाहतुकीचा अक्षरशः बोजवारा उडाला आहे.
कल्याण शीळ रोडवर मेट्रो 12 चे काम सुरू करण्यात आलंय .या कामामुळे निम्मा रस्ता व्यापला गेल्याने कल्याण शीळ रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक बेजार झाले आहेत .त्यातच या वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका ,शाळेच्या बसेस अडकत असल्याने विद्यार्थी ,रुग्णाचे देखील हाल होत आहेत.आज सकाळी रस्त्यावर नेहमीप्रमाणे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. या वाहतूक कोंडीत मोठ्या प्रमाणात शाळेच्या बसेस अडकल्या.
वाहतूक कोंडी सोडवण्याबाबत वाहतूक पोलीसांचे शून्य नियोजन
कल्याण शीळ रोड मानपाडा परिसरात असलेली विद्यानिकेतन शाळेच्या बसेस देखील या वाहतूक कोंडीत अडकल्या होत्या. दुपारी साडेअकरा वाजून गेले तरी बस शाळेत न आल्याने अखेर शाळा प्रशासनाने दुपारच्या सत्रातील विद्यार्थ्यांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला . याबाबत विद्यानिकेतनचे संचालक विवेक पंडित यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मेट्रोचे काम सुरू आहे मात्र वाहतूक पोलिसांचा नियोजन नसल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते त्याचबरोबर नागरिक गाड्या चालवतायत ते वाहतूक कोंडीत भर घालत आहेत. वाहतूक कोंडी सोडवण्याबाबत वाहतूक पोलीसांचे शून्य नियोजन असल्याचा आरोप केला .
वाहतूक कोंडीमुळे शाळा बंद ठेवावी लागते हे लज्जास्पद : मनसे आमदार राजू पाटील
वाहतूक कोंडीवर मनसे आमदार राजू पाटील यांनी संतापजनक प्रतिक्रिया देत वाहतूक कोंडीवर नियोजन नसल्याने नामांकित शाळा वाहतूक कोंडीमुळे बंद ठेवावी लागते ही बाब लोकप्रतिनिधी म्हणून आमच्यासाठी लज्जास्पद आहे. कल्याण शिळ रोडवर होणारी वाहतूक कोंडी मेट्रोच्या कामामुळे होत आहे वाहतुकीचे नियोजन नाही अनेक नागरिकांनी आमदार खासदार यांना मेसेज कॉल केले या वाहतूक कोंडीवर खासदार पोलीस आणि आमची मीटिंग आहे. या वाहतूक कोंडीमुळे शाळा बंद ठेवावी लागते लोकप्रतिनिधी म्हणून ही बाब आमच्यासाठी लज्जास्पद आहे.