रायगडमधील पाचही शासकीय वसतिगृहे भाडेतत्त्वावर, एका विद्यार्थ्यावर १००० रुपयापेक्षा अधिक खर्च
शासकीय वसतिगृह योजना मागासवर्गीय मुलां-मुलींची शिक्षणाची सोय व्हावी, त्यांना उच्च शिक्षण घेता यावे. तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुला-मुलींना विद्यालयीन व महाविद्यालयीन शिक्षण घेता यावे, यासाठी रायगड जिल्ह्यात शासकीय वसतिगृह योजना राबविण्यात आली आहे. तरी जिल्ह्यात असणारे पाचही वसतिगृहे ही भाड्याच्या घरात असून त्यासाठी लाखो रुपये भाड्यापोटी शासन खर्च करीत आहेत.
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील मुले व मुली शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत, या हेतूने शासकीय वसति शाळा योजना राबविली जाते. रायगड जिल्ह्यात महाड, अलिबाग, पनवेल, सुधागड आणि पाली आदी ठिकाणी पाच वस्तीगृह असून त्यामध्ये तीनशे ऐंशी विद्यार्थी त्याचा लाभ घेत आहेत. शासन प्रत्येक विद्यार्थी मागे एक हजार चारशे हुन अधिक खर्च भाडे पोटी करीत आहेत. शासनाच्या ध्येय धोरणानुसार साधारणपणे माहे जूनपासून शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश देण्याची कार्यवाही सुरू केली जाते.
सर्वसामान्य तळागाळातील वंचित व गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या योजनांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठीच्या संधी उपलब्ध होत आहेत. तसेच अनुसूचित जाती व अनुसचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळून, आर्थिक अडचणी कमी झाल्यामुळे चांगल्या प्रकारे शिक्षण घेण्याच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.
वसतिगृहातील प्रवेशित विद्यार्थ्यांना मोफत निवास, भोजन, अंथरुण-पांघरुण व ग्रंथालयीन सुविधा दिली जाते. विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी दोन गणवेश, क्रमिक पुस्तके, वह्या, स्टेशनरी दिली जाते. वैद्यकीय व अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी विविध साहित्य दिले जाते. दैनंदिन खर्चासाठी विद्यार्थ्यांना प्रतिमहिना निर्वाहभत्ता दिला जातो.
संवाद उपक्रम हा शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे सोयीसुविधा मिळतात की नाही, त्यांच्या अडी अडचणी समजून घेणे. तसेच त्यांच्या शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने नवनवीन संकल्पना राबवण्याच्या अनुषंगाने संवाद उपक्रम राबविला जात आहे. या अंतर्गत समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त, समाजकल्याण अधिकारी विविध ठिकाणी शासकीय वसतिगृहांना भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधतात.
रायगड जिल्ह्यात विद्यार्थ्यासाठी वसतिगृह हे मालकीच्या जागेत असावे. यासाठी शासन स्तरावर पत्रव्यवहार सुरू असून दोन ठिकाणी जागा ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू आहे. – सुनील जाधव. सहाय्यक आयुक्त. समाज कल्याण. रायगड.
भाडेतत्त्वावरील वसतिगृहाचे नाव/विद्यार्थी संख्या/इमारत भाडे
अलिबाग/७५/९७८८८
महाड/७५/१५९७७२
पनवेल/७५/३२९३०२
अलिबाग/८०/५००११
सुधागड/७५/८६७१७