उकाड्यानं आता राज्यातून टप्प्याटप्प्यानं काढता पाय घेतला असून, राज्यत मान्सून मोठ्या मुक्कामासाठी पोहोचला आहे. सध्याच्या घडीला या नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी चांगला जोर धरला असून, मुंबई पुण्यासह मराठवाड्यापर्यंत मजल मारली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार यंदाच्या वर्षी मान्सूनची वेगानं प्रगती होताना दिसत असून देशाप्रमाणं राज्यातही तो अंदाजे वर्तवण्यात आलेल्या वेळेआधीच दाखल झाला. (Monsoon Updates)
सर्वसाधारणपणे मान्सून मुंबईत 11 जूनला दाखल होतो. यंदा मात्र मान्सून मुंबईत दोन दिवस आधिच दाखल झालाय. भारतीय हवामान विभागानं याबाबतची अधिकृत घोषणा केली. पुढील 24 तासांमध्ये मुंबई शहर आणि उपनगरामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. यादरम्यान, शहरासह उपनगरीय क्षेत्रातील वातावरण पूर्णत: ढगाळ राहणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. पावसाची एकंदर वाटचाल पाहता हवामान खात्यानं ठाणे, रायगड, रत्नागिरीसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट, मुंबईसाठी यलो अलर्ट आणि कोकणात सिंधुदुर्गसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
इथं पावसानं हजेरी लावून 48 तासांचा काळही उलटला नाही, तोच पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाल्याचं पाहायला मिळालं. सायन, माटुंगा, दादर, परळ भागात पावसाचं मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं, ज्यामुळं नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
राज्याच्या बहुतांश भागात पावसाची हजेरी
नाशिकच्या येवला शहरात रविवारी तुरळक पावसानं हजेरी लावली. झालेल्या पावसामुळे उकाड्यापासून हैराण झालेले नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. तर सिन्नरच्या काही गावांत पेरणी योग्य पाऊस झाल्यानं शेतकरी वर्गात समाधानाचं वातावरण पाहायला मिळालं. तिथं अकोला शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली. रविवारी संध्याकाळपासूनच इथं वातावरणात बदल होण्यास सुरुवात झाली होती.
कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातही मान्सूनचं जोरदार आगमन झालं. अनेक भागात मुसळधार पाऊस पडल्यामुळे अनेक सखल भागांत पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळालं. पावसामुळं कोल्हापुरातील रस्ते, ओढे, नाले ओसंडून वाहू लागले आहेत. थोडक्यात मान्सूनच्या पहिल्याच सरीमुळे कोल्हापुरात कमाल वातावरण पाहायला मिळत आहे.
दरम्यान मान्सूनच्या पुढील वाटचालीसंदर्भात सांगावं तर, पुढच्या 48 तासांमध्ये मान्सून देशाच्या आणखी काही भागांमध्ये वाटचाल करणार असून, ते उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात प्रगती करताना दिसतील. सध्या देश स्तरावर मान्सून ओडिशा, छत्तीसगढ आणि आंध्र प्रदेशातील काही भागांमध्ये दाखल झाला असून, पुढे तो अरबी समुद्रातील क्षेत्रात चांगली प्रगती करेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
