Monsoon News : घनन घनन घन! येत्या 24 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार
देशात एकिकडे तापमानानं पन्नाशीचा आकडा ओलांडलेला असतानाच या प्रचंड उकाड्यामध्ये दिलासा देण्यासाठी मान्सून सज्ज झाला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार येत्या 24 तासात मान्सून केरळमध्ये (Monsoon In Kerala) दाखल होण्याचा प्राथमिक आणि महत्त्वाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
सध्या मान्सूनच्या प्रवासाच्या अनुषंगानं आणि हे मोसमी वारे केरळमध्ये दाखल होण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचीही माहिती हवामान विभागानं दिली. प्राथमिक अंदाजानुसार मान्सून केरळमध्ये 31 मे रोजी धडकण्याची शक्यता होती. पण, तो अशाच वेगानं पुढे येत राहिला तर काही तास आधीच केरळची वेस ओलांडू शकतो. दरम्यान मान्सूनच्या आगमनानंतर देशात म्हणजेच 31 मे पासून उष्णतेची लाट ओसरणार असल्याचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे. येत्या काही दिवसांत अरबी समुद्रातून वारे वाहू लागल्यानं तापमानातही काही अंशांची घट अपेक्षित असल्याचं हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ नरेश कुमार यांनी स्पष्ट केलं आहे.