‘रोहित पवारांना अटक करा, त्यांचा फोन तपासा, हातात पैशाच्या बॅगा..’; मतदानाच्या दिवशी मागणी
राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटांनी बारामती मतदारसंघामध्ये आपआपला उमेदवार जिंकून येण्यासाठी संपूर्ण जोर लावल्याचं चित्र दिसत आहे. बारामतीमधून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे या शरद पवार गटाकडून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आज तिसऱ्या टप्प्यातील मतदानामध्ये महाराष्ट्रातील 11 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडत असून त्यामध्ये बारामती मतदारसंघाचाही समावेश आहे. बारामतीमधील मतदानाच्या आदल्या रात्री मतदारसंघात पैशांचं वाटप करण्यात आल्याचा आरोप रोहित पवारांनी विरोधकांचा उल्लेख करत केला आहे. मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावत आता सुनेत्रा पवारांच्या पक्षाने रोहित पवारांच्या अटकेची मागणी केली आहे.
रोहित पवारांनी नेमकं काय म्हटलं?
रोहित पवारांनी सोशल मीडियावर बारामतीमधील काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले. हे व्हिडीओ शेअर करताना रोहित पवारांनी, ‘पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वेल्हे येथील शाखा मध्यरात्रीनंतरही सुरु होती’ असा दावा केला आहे. तसेच पुढे बोलताना ‘बारामतीमध्ये पोलीस बंदोबस्तात पैशांचा पाऊस पडला’ असा दावा करताना रोहित पवारांनी काही व्हिडीओ शेअर केले आहेत. या व्हिडीओमध्ये कारच्या सीटवर 500 रुपयांच्या नोटा पडल्याचं दिसत आहेत. तसेच याच कारमध्ये घड्याळ निवडणूक चिन्ह असलेलं प्रचार साहित्यही दिसत आहे.”विचारांची कास सोडलेल्यांना दिवसा सामान्य लोकांची कामं करता येत नाहीत. मात्र बारामती मतदारसंघात निवडून येण्यासाठी रात्रभर जे ‘उद्योग’ सुरू आहेत त्याचे हे व्हिडीओ,” असं म्हणत रोहित पवारांनी कथित पैसे वाटपाचे व्हिडीओ शेअर केले आहेत.
रोहित पवारांना अटक करण्याची मागणी
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियामध्ये रोहित पवारांनीच हा कट रचल्याचा आरोप करत त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. “रोहित पवारांकडून बारामती मतदारसंघामध्ये रडीचा डाव सुरु झाला आहे. आपलीच लोक, स्वत:ची माणसं घड्याळ चिन्हाचं लेबल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करण्यासाठी फिरवत आहेत. त्यांच्या हातात पैशाच्या बॅगा देत आहेत. या माध्यमातून समाजामध्ये वेगळं वातावरण निर्माण करण्याचं काम कट कारस्थानाअंतर्गत रोहित पवार करत आहेत,” असं चव्हाण म्हणाले आहेत. तसेच पुढे बोलताना, “रोहित पवारांनी हा रडीचा डाव थांबवावा. माझी निवडणूक आयोगाला आणि ग़ृहखात्याला विनंती आहे की रोहित पवारांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील फोनमधील सखोल चौकशी करावी. त्यांनी अजून किती लोकांना बारामती मतदारसंघाचं वातावरण गढूळ करण्यासाठी सोय केली आहे याची पोलिसांनी चौकशी करावी,” अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.
दरम्यान, शरद पवार, सुप्रिया सुळेंनी सकाळी 9 च्या सुमारच्या काटेवाडी येथील मतदानकेंद्रावर मतदानाचा हक्क बजावला आहे.