Nepal Earthquake : नेपाळमधील विनाशकारी भूकंपाचे हादरे उत्तर भारतापर्यंत; मृतांचा आकडा मोठा
दिल्लीसह उत्तर भारत भूकंपाने हादरला आहे. नेपाळमध्ये झालेल्या 6.4 रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के उत्तर भारतालाही बसले. ज्यामध्ये दिल्लीसह बिहार, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेशला भूकंपाचे हादरे बसले. या भूकंपाने नेपाळमध्ये अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर अद्यापही अनेकजण ढिगाऱ्याखाली दबून जखमी झाल्याचीही माहिती मिळतेय. नेपाळच्या जाजरकोट जिल्ह्यातील लामिडांडा भागात भूकंपाचा केंद्रबिंदू होता.
मृतांचा आकडा वाढला
नेपाळमध्ये झालेला भूकंप इतक्या भीषण स्वरुपाचा होता, की या भूकंपात आतापर्यंत 129 जणांनी जीव गमावल्याची माहिती समोर येत आहे. येत्या काही तासांत हा आकडा वाढू शकतो अशी भीती स्थानिक प्रशासन आणि बचाव पथकांनी व्यक्त केली आहे. नेपाळमधील रकुम येथील पश्चिमेकडे असणाऱ्या प्रांतामध्ये 36 तर, जाजरकोटमध्ये आतापर्यंत 92 नागरिकांचा मृत्यू ओढावल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
देशावर आलेलं हे संकट पाहता नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल यांनी या महाभयंकर भूकंपानंतर बचावकार्यासाठी तीन सुरक्षा संस्थांना तैनात केल्याची माहिती मिळत आहे. नेपाळमधील भूकंपाची तीव्रता इतकी जास्त होती की, दिल्ली आणि उत्तर भारतातही हादरे जाणवले. दिल्ली एनसीआरमध्ये अचानकच भूकंप जाणवल्यानं उंच इमारतींपासून बंगल्यांमध्ये राहणारी मंडळीसुद्धा गोंधळल्याचं पाहायला मिळालं. मागील दोन महिन्यांमध्ये दिल्लीमध्ये असे धरणीकंप जाणवण्याची ही दुसरी वेळ.