‘उपमुख्यमंत्र्यांकडून दगाफटका होऊ शकतो म्हणून…’; मनोज जरांगेचा सरकारला इशारा
मराठा आरक्षणावरुन (maratha aarakshan) राज्यात आंदोलन पेटलं आहे. एकीकडे राज्य सरकारने कुणबी पुरावे असलेल्या लोकांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र (kunbi certificates) देण्यासाठीचा जीआर काढलाय. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आमरण उपोषणावर ठाम आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी अधिवेशन बोलवून मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र ओबीसीमध्ये समावेश करावा अशी मागणी केली आहे. या मागण्या मान्य झाल्या नाहीतर आजपासून पाणी पिणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनाही जरांगे पाटील यांनी लक्ष्य केलं आहे.
“आंदोलन खूप मोठं झालंय. मराठा समाजाल आरक्षण दिल्याशिवाय इथून उठणार नाही. आमच्याकडून उद्रेक होणार नाही. अशी बैठक बोलवण्याची दुसरी वेळ आहे. आरक्षण का देत नाही किंवा किती दिवस लागतील हे स्पष्ट करणे महत्त्वाचे आहे. सगळ्यांना विनंती आहे की तातडीने विशेष अधिवेशन बोलवायला लावला. त्यामध्ये मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र ओबीसीमध्ये समावेश करावा. मराठा समाजाचे तरुण शांततेत आहेत. सरकारमधीलच लोक आंदोलन करत असतील. अधिवेशनाचा निर्णय घेतला नाही तर मी संध्याकाळपासून पाणी सोडणार,” असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
“आता राणे साहेबांनी बोलू नये अशी माझी इच्छा आहे. काल माझ्याशी फोन करुन गोडगोड बोलतात. पण आता याच्यापुढे बोलू नका. त्यांना भेटल्यावर सांगतो बोलवता धनी कोण आहे. एकीकडून गोड बोलतात आणि दुसरीकडून गुन्हे दाखल करतात. यामुळे मी बोलतो. त्यांच्यामुळेच भाजप संपायला लागली आहे. गोरगरिबाच्या कार्यकर्त्यांना मारहाण करतात आणि स्वतःला उच्च नेते म्हणवतात. तुला आता कळेल. तुम्ही उच्च आहात की मतदानाच्या चिठ्ठ्या वाटायच्या झालात हे थोडं थांबल्यावर कळेल,” असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
“अधिवेशनाची घोषणा केली नाही आणि सरकसकट कुणबी प्रमाणत देण्याची घोषणा केली नाही मी संध्याकाळपासून पाणी बंद करणार. तसेच पूर्ण ताकदीने महाराष्ट्रात आंदोलने सुरु होणार. उपमुख्यमंत्री जाणून बुजून इंटरनेट बंद करतात, शांततेत आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करतात, यात लोकांचा काय दोष? इंटरनेट बंद केल्यावर लोकांचा रोष होणारच. उपमुख्यमंत्र्यांकडून दगाफटका होऊ शकतो असं लोकांना वाटतं. आम्ही घाबरत नाही,” असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.