Maratha Reservation: गैरफायदा घेणाऱ्या समाजकंटकांना अटक करा, मुख्यंत्र्याचे आदेश
राज्यात शांततेत सुरु असलेल्या मराठा आरक्षणाला काही ठिकाणी गालबोट लागले आहे. संतप्त जमावाने राजकीय नेत्यांची घरे, गाड्या जाळण्याचा प्रयत्न केला. शांततेच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांची बैठक झाली. या बैठकीत मराठा आरक्षण आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आली. यानंतर काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
महाराष्ट्रतील मराठा समाज आक्रमक झाला असून त्या संदर्भात माहिती घेऊन महत्वाचे निर्णय यावेळी घेण्यात आले. राज्यातील कायदा सुव्यवस्था या अनुषंगाने बैठकीत चर्चा करण्यात आली. तर आज होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत मराठा आरक्षण विषयी महत्वचा निर्णय होऊ शकतो त्या अनुषंगाने महत्वाची चर्चा करण्यात आली.
सीएम डीसीएम आणि पोलीसांच्या बैठकीत पोलीस महसंचालक यांनी दिवसभराच्या घडामोडींचा आढवा समोर ठेवला. मराठा समाजाच्या आंदोलनाचा गैरफायदा काही समाजकंटक घेत आहेत. या समाजकंटकांचा शोधण्याचं काम सुरु आहे. घर जाळणं, त्यातून चोऱ्या करण्याचा उद्देश या समाजकंटकांचा आहे. हे समाजकंटक आंदोलनांचा गैरफायदा घेऊ शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात आली.
या समाजकंटकांना आळा घालण्यासाठी पोलीसांच्या विविध तुकड्या सतर्क आहेत. तसेच गुप्तचर यंत्रणा यावर काम करत आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून राज्यातील पोलिस अधिक्षकांकडून परिस्थितीचा आढावा घेतला गेलाय .राज्यात ज्या ज्या ठिकाणी उद्रेक झाला आहे त्याच बरोबर संभाव्य ठिकाणी उद्रेक होण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी संचार बंदी व कलम 144 चा वापर करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
राज्यात शांतता- कायदा आणि सुव्यवस्था हाताबाहेर जाऊ नये यावर सरकारचा प्राथमिकरित्या भर असण्यावर चर्चा सुरू आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून आक्षेपार्ह पोस्ट आणि आंदोलनाबाबत आक्रमक पोस्ट केल्या जात आहेत. यावर सायबर पोलिसाकडून विशेष लक्ष ठेवण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळते.