कोरोनानंतर जगासमोर नवं संकट? दहशत डोळ्यांमधून रक्त पडणाऱ्या संसर्गजन्य Virus ची
फ्रान्समध्ये जगातील सर्वात घातक संसर्गापैकी एकाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. या विषाणूचा संसर्ग झाल्यास डोळ्यांमधून रक्त वाहू लागतं. याच लक्षणावरुन या संसर्गाला नाव देण्यात आलं आहे. क्रीमियन-कांगो रक्तस्रावी तापाची लाट (Crimean-Congo haemorrhagic fever-CCHF) सध्या युरोपीयन देशांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. लवकरच ब्रिटनच्या सीमारेषा ओलांडून देशात प्रवेश करेल अशी भीती वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे. फ्रान्समधील आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “हा विषाणू सर्वात आधी उत्तर-पूर्व स्पेनच्या सीमेला लागून असलेल्या पाइरेनीस ओरिएंटेल्स येथे एका किटकामध्ये आढळू आला होता. मात्र याचा संसर्ग झालेली एकही व्यक्ती अद्याप आढळून आलेली नाही.”
40 टक्के लोकांची दगावण्याची शक्यता
वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रीमियन-कांगो रक्तस्रावी तापाचा संसर्ग किड्याच्या माध्यमातून होतो. हा किडा प्रामुख्याने आफ्रिका, बाल्कन प्रांत, मध्य-पूर्व आशिया आणि आशियामधील उष्ण ठिकाणी पाणी आणि हवेत सापडतो. जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्ल्यूएचओने दिलेल्या माहितीनुसार, हा संसर्ग फारच दुर्मीळ असल्याने संसर्ग झालेल्यांपैकी 40 टक्के लोकांची दगावण्याची शक्यता असते.
फ्रान्सला या संसर्गाचा धोका
जुलै महिन्यामध्ये ब्रिटीश वैज्ञानिकांनी ग्लोबल वॉर्मिंगसंदर्भातून या विषाणूच्या संसर्गाचा इशारा दिला होता. ग्लोबल वॉर्मिंगमुळे सामान्यपणे ज्या भागांमध्ये या विषाणूचा संसर्ग होतो त्याच्या प्रांतांच्या बाहेरही याचा संसर्ग होऊ शकतो. खास करुन युनायटेड किंग्डम आणि फ्रान्सला या संसर्गाचा धोका आहे. सन 2016 पासून 2022 दरम्यान स्पेनमध्ये या विषाणूचा संसर्ग झालेले 7 रुग्ण आढळून आले. यापैकी 3 रुग्णांचा मृत्यू झाला.
ब्रिटनला बसणार फोटो
वैज्ञानिक बैठकीदरम्यान कॅम्ब्रिज विद्यापीठामधील पशू चिकित्सा विभागाचे प्रमुख प्राध्यापक जेम्स वूड यांनी, सीसीएचएफचा संसर्ग हा किटकांच्या माध्यमातूनच होतो. ब्रिटनपर्यंत हा संसर्ग पोहोचला आहे, असं सांगितलं. ‘द सन’शी बोलताना लिव्हरपूर विद्यापीठाचे संसर्ग विभागाचे प्राध्यापक पॉल विगले यांनी जेम्स वूड यांच्या मताशी समहती दर्शवली आहे. भविष्यात हा संसर्ग ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणात होऊ शकतो असं पॉल विगले म्हणाले आहेत.
दिलासा एकच की…
2019 च्या शेवटी चीनमधील वुहानमधून अशाप्रकारे जगभरात परसलेल्या कोरोनाने संपूर्ण जगभरातील व्यवहार ठप्प केले होते. या संसर्गामुळे बसलेल्या आर्थिक फटक्यामधून संपूर्ण जग सावरत असतानाच आता ब्रिटनमधून समोर आलेल्या या धक्कादायक माहितीमुळे पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र मागील काही वर्षांमधील या आजाराच्या रुग्णांची संख्या पाहिल्याच त्याचा प्रादुर्भाव सध्या तरी फार वेगाने होत नसल्याचं दिसत आहे.