देश

‘मी लोकसभेचा ID लॉगइन-पासवर्ड हिरानंदानीला दिला होता, त्याने…’, महुआ मोईत्रा यांचा मोठा खुलासा

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी उद्योगपतींकडून पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आला असून, यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, महुआ मोईत्रा यांनी आपण उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांना लोकसभा वेबसाईटचा लॉग-इन आणि पासवर्ड दिला होता अशी कबुली दिली आहे. आपल्यातर्फे त्यांनी प्रश्न विचारावेत यासाठी त्यांना लॉग-इन आणि पासवर्ड दिल्याचा महुआ मोईत्रा यांचा दावा आहे.

महुआ मोईत्रा यांनी इंडिया टुडेशी संवाद साधताना सांगितलं की, दर्शन हिरानंदानी यांच्या कार्यालयतालील एका व्यक्तीने हे प्रश्न टाइप केले होते, जे मी लोकसभेच्या वेबसाईटवर दिले होते. हे प्रश्न विचारल्यानंतर ते मला माहिती देत असत. यानंतर मी हे प्रश्न वाचत असे, कारण मी नेहमीच माझ्या मतदारसंघात व्यग्र असे. हे प्रश्न टाइप केल्यानंतर माझ्या मोबाईलवर एक ओटीपी येत असे. मी त्यांना हा ओटीपी द्यायची. यानंतर ते प्रश्न सबमिट होत असतं. त्यामुळे दर्शन माझ्या आयडीवरुन लॉग इन करायचा आणि स्वत: प्रश्न टाइप करत असे असं म्हणणं हास्यास्पद आहे.

महुआ मोईत्रा यांचं हे विधान दर्शन हिरानंदांनी यांच्या आरोपांनंतर आलं आहे. महुआ यांच्यातर्फे प्रश्न विचारता यावा यासाठी महुआ मोईत्रा मला लोकसभेचा आपला लॉग-इन आणि पासवर्ड देत होत्या असा खुलासा त्यांनी केला आहे.

भाजपा नेते निशिकांत दुबे यांच्या आरोपांना उत्तर देताना महुआ मोईत्रा यांनी सांगितलं आहे, ‘कॅश फॉर क्वेरी’चं हे प्रकरण फसल्यानंतर आता हे राष्ट्रीय सुरक्षा प्रकरण म्हणून समोर आणलं जात आहे. मी लोकसभेचा आपला लॉग-इन आयडी एका विदेशी संस्थेला दिल्याचा भाजपाचा दावा आहे. दर्शन माझा मित्र आहे आणि त्यांच्याकडे भारतीय पासपोर्ट आहे. त्याने दुबईवरुन लॉग-इन केलं असंही भाजपाचं म्हणणं आहे. मी स्वत: स्वित्झर्लंडवरुन लॉग-इन केलं आहे. त्यातही जर एवढी चिंता असेल तर मग आयपी अॅड्रेसवर निर्बंध का लावत नाही?”.

कॅश फॉर क्‍वेरी प्रकरणात संसदेच्या आचारसंहिता समितीने महुआ मोईत्रा यांना 31 ऑक्टोबरला हजर राहण्यासाठी समन्स पाठवलं आहे. समितीचे अध्यक्ष विनोद सोनकर म्हणाले आहेत की, समितीने भाजप खासदार निशिकांत दुबे आणि वकील जय अनंत देहाडराय यांना चौकशीसाठी बोलावले होते.

काय आहेत आरोप?
भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी महुआ यांच्यावर आरोप केला आहे की, त्या पैसे आणि गिफ्ट घेऊन संसदेत प्रश्न विचारतात. निशिकांत दुबे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून आरोप केला आहे. वकील जय अनंत देहाद्रई यांच्या रिसर्चच्या हवाल्याने त्यांनी हा आरोप केला आहे. दुबे यांच्या आरोपानंतर ओम बिर्ला यांनी लोकसभेच्या आचारसंहिता समितीकडे प्रकरण सोपवलं आहे.

Related Articles

Back to top button