गाझापट्टीत जन्माला आलाय नवा ओसामा; इस्त्रायल हल्ल्याचा मास्टरमाईंड
इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवाद्यांत युद्ध पेटल आहे. हमास या अतिरेकी संघटनेच्या लष्करी शाखेचा नेता मोहम्मद देईफ याची सगळीकडे चर्चा होत आहे. हा देईफ नेमका कोण आहे? हमास आणि देईफचा काय संबंध आहे? अमेरिकेने त्याला दहशतवादी म्हणून का घोषित केलंय? तसंच इस्रायलनं त्याला अनेकवेळा मारण्याचा प्रयत्न का केलाय? असे अनेक सवाल उपस्थित झालेत. देईफला नवा ओसाम म्हटलं जात आहे. त्यामुळेच जगाची चिंता वाढली आहे.
नवा ओसामा अर्थात मोहम्मद देईफ आहे तरी कोण?
मोहम्मद दियाब इब्राहीम अल-मास्री वय 58 वर्ष. वयाच्या 20व्या वर्षीच त्याने हमासमध्ये प्रवेश केला. 2002 पासून मोहम्मद देईफ हमासचा लष्करप्रमुख आहेत. देईफ इस्लामिक युनिव्हर्सिटी ऑफ गाझाचा विद्यार्थी आहे. 20व्या वर्षीच आत्मघाती बॉम्बहल्ल्यासाठी लोकांना उद्युक्त केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. देईफला हात, पाय आणि एक डोळा नसल्याचा दावा केला जात आहे. देईफला मारण्याचा 7 वेळा प्रयत्न झाला.
देईफच्या घरावर क्षेपणास्त्रे डागून त्याला ठार करण्याचा प्रयत्न
इस्रायलमध्ये देईफ हा मोस्ट वॉन्टेंड दहशतवाद्यांच्या यादीत होता. इस्रायली लष्कराने त्याला मारण्याचा अनेकवेळा प्रयत्न केलाय.. मात्र प्रत्येकवेळी तो निसटण्यात यशस्वी ठरला. ज्या वर्षी त्याने हमासच्या लष्करी शाखेचे प्रमुखपद स्वीकारले होते, तेव्हा इस्रायलने गाझा शहराच्या जवळ त्याच्या कारवर हेलिकॉप्टरच्या माध्यमातून क्षेपणास्त्र डागली होती. इस्रायलने देईफच्या घरावर क्षेपणास्त्रे डागून त्याला ठार करण्याचा प्रयत्न केला होता. या हल्ल्यात देईफची पत्नी आणि सात महिन्यांचे मूल यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतं.
खलिस्तानचं ‘हमास’ प्रेम, पुन्हा पंजाबवर नेम
हमाससारख्या रानटी दहशतवादी संघटनेमुळे भारताच्या शत्रुंना चेव आलाय. खलिस्तानी दहशतवादी आणि शीख फॉर जस्टिसचा म्होरक्या गुरपतवंत सिंह पन्नूनं पुन्हा एकदा भारताविरोधात गरळ ओकलीय. हमासनं इस्रायलवर जसा हल्ला केला तसाच हल्ला भारतावरही करू असा इशारा गुरपतवंत सिंह पन्नूनं दिला आहे. धक्कादायक म्हणजे भारतानं पंजाबवर अतिक्रमण केलंय अशी मुक्ताफळं पन्नूनं उधळली आहेत. भारतानं पंजाबला मुक्त केलं नाही तर भयंकर दृश्य पाहावं लागेल अशी धमकीच पन्नूनं दिली आहे.
पंजाबवर हल्ला करण्याची धमकी
पॅलेस्टाईनकडून इस्रायलवर हल्ले होत आहेत. पंतप्रधान मोदींनी या हल्ल्यापासून धडा घेण्याची गरज आहे. इस्रायलच्या धर्तीवर भारताने पंजाबवर ताबा मिळवला आहे. भारताने हिंसाचार सुरू केला तर आम्हीही हिंसाचार सुरू करू.भारताने पंजाबमध्ये अतिक्रमण सुरूच ठेवले तर नक्कीच याचे पडसाद उमटतील. यासाठी पंतप्रधान मोदी आणि भारत सरकार जबाबदार असेल. पंजाबमध्ये राहणाऱ्या लोकांनी पॅलेस्टाईनप्रमाणे हिंसाचार सुरू केला तर परिस्थिती विनाशकारी होईल. भारताने पंजाबला मुक्त करावं. तसं न केल्यास इस्रायलसारखे भयंकर दृश्यही पहावे लागेल असा इशारा गुरपतवंत सिंह पन्नू याने व्हिडिओच्या माध्यमातून दिला आहे.