Chandrayaan 3 LIVE: 5…4…3…2…1 चांद्रयान 3 चंद्रावर उतरण्याच्या तयारीत; देशभरात उत्साह
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं चंद्राच्या दिशेनं पाठवलेलं चांद्रयान 3 आता चंद्रावर उतरण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहे. शास्त्रज्ञांनी प्रचंड मेहनतीनं हाती घेतलेली ही मोहिम आता शेवटच्या टप्प्यात आली असून, हा टप्पा आव्हानात्मक असला तरीही तो अशक्य नाही, असा विश्वास इस्रोप्रमुखांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, बुधवारची संध्याकाळ किंबहुना 23 ऑगस्ट 2023 हा दिवस भारतासाठी आणि संपूर्ण अंतराळ क्षेत्रासाठी ऐतिहासिक ठरणार आहे.
इस्रोच्या चांद्रयान 3 मोहिमेच्या निमित्तानं पृथ्वीवरील पहिलाच कृत्रिम उपग्रह चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचण्याची किमया घडणार आहे. अधिकृत माहितीनुसार चांद्रयानातील विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोवर मॉड्युल बुधवारी सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठावर पोहोचतील. चंद्रावरील ही लँडींग यशस्वी ठरल्यास अमेरिका, चीन आणि पूर्व सोवियत संघामागोमाग भारत हे काम करणारा जगातील चौथा देश ठरणार आहे.