रॉबर्ट वाड्रांवर अटकेची टांगती तलवार? लंडनमधील 18 कोटींच्या संपत्तीसंदर्भात ED थेट कोर्टात
क्राँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांचे जावई आणि पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांचे पती रॉबर्ट वाड्रा (Robert Vadra) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीने (Enforcement Directorate) वाड्रा यांना देण्यात आलेल्या जामीनासंदर्भात आक्षेप घेतला आहे. मनी लॉन्ड्रींग प्रकरणामध्ये वाड्रा यांना ज्या अटींवर जामीन मंजूर करण्यात आला त्या अटींचं पालन केलं जात नसल्याचा दावा ईडीने केला आहे. ईडी कोर्टासमोर आपलं म्हणणं एका प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून मांडणार आहे. ईडीने घेतलेल्या याच आक्षेपामुळे वाड्रा यांच्या अडचणी वाढण्याची दाट शक्यता आहे.
ईडीने मागितला 2 आठवड्यांचा वेळ
ईडीची बाजू कोर्टासमोर मांडताना वकिलांनी रॉबर्ट वाड्रा यांनी जामीन मंजूर करताना घालण्यात आलेल्या अटी पाळल्या नाहीत असा आरोप केला. कोर्टाकडे ईडीने यासंदर्भात 2 आठवड्यांचा वेळ मागितला होता. कोर्टाने यासाठी परवानगी दिली. आता या प्रकरणातील पुढील सुनावणी सप्टेंबर महिन्यात होणार आहे. या सुनावणीमध्येच वाड्रा यांच्या जामीनासंदर्भातील महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो.
वाड्रा यांचे वकील काय म्हणाले?
ईडीने घेतलेल्या आक्षेपासंदर्भात बोलताना वाड्रा यांच्या वकिलाने ईडीचे सर्व दावे फेटाळले आहेत. वाड्रा यांनी सर्व अटींचं योग्य पद्धतीने पालन केल्याचा दावा त्यांच्या वकीलाने केला आहे. जेव्हा जेव्हा त्यांना ईडीने तपासासाठी बोलावलं तेव्हा ते हजर राहिले होते असंही वकिलांनी सांगितलं. पुराव्यांशी कोणत्याही पद्धतीची छेडछाड करण्यात आलेली नाही. या प्रकरणाशी संबंधित सर्व पुरावे आधीच ईडीने ताब्यात घेऊन सिझ केले आहेत असं वाड्रांच्या वकिलांनी सांगितलं. हे पुरावे ईडीच्या ताब्यात असल्याने त्यांच्याशी छेडछाड करण्याचा काही प्रश्नच नसल्याचं वाड्रांच्या वकिलाने म्हटलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा हे लंडनमधील त्यांच्या संपत्तीच्या मुद्द्यावरुन अडचणीत आले आहेत. या संपत्तीची किंमत जवळपास 18 कोटी रुपये इतकी आहे. या प्रकरणामध्ये त्यांच्याविरोधात मनी लॉण्ड्रींगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास ईडी करत आहे. सध्या कोर्टाकडून या प्रकरणामध्ये वाड्रा यांना अगाऊ जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र ईडीने केलेले आरोप खरे ठरले जर वाड्रांचा जामीन रद्द केला जाऊ शकतो. जामीन रद्द झाल्यास वाड्रा यांना ईडी ताब्यात घेऊ शकते अथवा त्यांना तुरुंगात जावं लागू शकतं असंही म्हटलं जात आहे.