मुंबईसह कोकणात पावसाच्या हलक्या सरी; राज्याच्या ‘या’ भागाला यलो अलर्ट
पावसाची मोठी सुट्टी अद्यापही संपलेली नाही हेच आता स्पष्ट होत आहे. कारण, मुंबईसह पश्चिम उपनगर आणि नवी मुंबईतही पावसानं काहीशी उसंत घेतलेली आहे. अशा या पावसाळी वातावरणाचा आनंद घेण्यासाठी म्हणून तुम्ही काही बेत आखत असाल तर आधी हवामानाचा अंदाज पाहून घ्या. कारण, सध्या काही निवडक भाग वगळता राज्याच्या कोणत्याही भागाला पावसाचा इशारा नाही. मुंबई आणि कोकणाच्या काही भागात पावसाच्या हलक्या सरी बसरण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. अधूनमधून या भागांमध्ये लख्ख सूर्यप्रकाशही पाहता येणार आहे. वाशिम जिल्ह्याला पुढच्या 2 दिवसांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मंगळवारीसुद्धा शहरात मुसळधार पाऊस झाला. यामुळे खरिपाच्या सोयाबीन, तूर या पिकांच्या मशागतीच्या कामांमध्ये अडथळा निर्माण झाला. असं असतानाच बुलढाणा जिल्ह्यावर मात्र दुष्काळाचं सावट आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने जिल्ह्यातल्या सर्व प्रकल्पांमध्ये 31.59 टक्के पाणीसाठा आहे. या सगळ्याचा परिणाम पेरणी झालेल्या पिकांवरही होण्याची शक्यता आहे. एकिकडे अती पाऊस धुमाकूळ घालून आता शआंत बसलेला असतानाच दुसरीकडे मात्र दुष्काळाची परिस्थिती उदभवली आहे. त्यामुळं राज्यात सध्या दोन टोकाचं हवामान पाहायला मिळतंय ही बाब नाकारता येणार नाही. ऑगस्ट महिन्याचे पहिले दहा दिवस पावसानं दडी मारल्यामुळं आता पुढच्या आठवड्यात तरी पाऊस पुन्हा जोर धरणार का याकडेच सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.