Cyber Crime: एक मेसेज आला अन् 72 लाखांचा फटका बसला! Gpay वरुन घातला गंडा
हिमाचल प्रदेशमध्ये ऑनलाइन फ्रॉडचा एक विचित्र प्रकार समोर आला आहे. फसवणूक झालेल्या व्यक्तीने ‘गुगल पे’वरुन फसवणूक करणाऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले. अनेकदा या व्यक्तीने ‘गुगल पे’वरुन (Gpay) फसवणूक करणाऱ्यांना पैसे पाठवले. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं तोपर्यंत या व्यक्तीच्या खात्यावरुन 72 लाख रुपये (72 Lakhs Rupees) गंडा घालणाऱ्यांच्या खात्यावर जमा झाले होते.
एक मेसेज आणि फसवणुकीला सुरुवात
समोर आलेल्या माहितीनुसार शिमल्यातील सायबर क्राइम पोलिसांकडे या प्रकरणाची तक्रार करण्यात आली आहे. लॉटरीच्या नावाखाली या व्यक्तीला लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आला. चंबा येथे राहणाऱ्या व्यक्तीबरोबर हा प्रकार घडला असून यामध्ये तब्बल 72 लाखांची चोरी करण्यात आली आहे. अडीच कोटी रुपयांची लॉटरी तुम्हाला लागी आहे, असा मेसेज आणि कॉल या व्यक्तीला आला आणि तिथूनच फसवणुकीला सुरवात झाली.
200 हून अधिक वेळा पाठवले पैसे
शिमल्यातील सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रार करणारा छंगा राम नावाची व्यक्ती चंबा येथील रहिवाशी आहे. आपल्याला 2.50 कोटींची लॉटरी लागल्याचा मेसेज आला होता. या पैशांच्या मोबदल्यात काही पैसे आधी भरावे लागतील असं फसवणूक करणाऱ्यांनी सांगितलं. मात्र त्यानंतर या व्यक्तीला वेळोवेळी हेच कारण सांगत अनेक ट्रॅनझॅक्शन या व्यक्तीने दिलेल्या खात्यावर केले. वैशिष्ट्य म्हणजे या व्यक्तीने तब्बल 200 हून अधिक वेळा या फसवणूक करणाऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले. यामध्ये गुगल पे ट्रान्झॅक्शनचाही समावेश होता.
…अन् फसवल्याची जाणीव झाली
मात्र अनेकदा पैसे देऊनही पुढे काही होत नसल्याचं पाहून या व्यक्तीला फसवणूक झाल्याची जाणीव झाली आणि त्याने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. शिमला सायबर पोलीस स्टेशनमध्ये 7/22 IPC च्या कलम 420 आणि आयटी अॅक्टअंतर्गत येणाऱ्या 66 डी कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस म्हणतात सावधान
हिमाचल प्रदेशच्या सायबर पोलिसांनी सोशल मीडियावरुनही लोकांना ऑनलाइन फ्रॉडपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. ट्विटरवरुन पोस्ट केलेल्या फोटोमध्ये लॉटरी लागल्याच्या मेसेजवर विश्वास ठेऊ नका असं आवाहन केलं आहे.
तसेच ऑनलाइन फसवणूक झाल्यास पोलिसांकडे तक्रार करावी असंही हिमाचल प्रदेश पोलिसांनी म्हटलं आहे.