शिंदे गटातील ‘या’ आमदाराला हृदयविकाराचा झटका, उपचारासाठी मुंबईला हलविले
शिंदे गटाचे (Shinde group) आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांना हृदयविकाराचा झटका आला. ( Sanjay Shirsat heart attack) शिरसाट यांना संभाजीनगरमधून उपचारासाठी मुंबईकडे रवाना करण्यात आले आहे. शिरसाट एअर अॅम्ब्युलन्सनं मुंबईला रवाना झाले आहेत. काल दुपारी त्यांना संभाजीनगरमधील सिग्मा हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.
संजय शिरसाट यांच्या संभाजीनगर येथे उपचार सुरु होते. मात्र, प्रकृतीत सुधारण होत नसल्याने आता त्यांना उपचारासाठी मुंबईला हलविण्यात आले आहे, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांकडून देण्यात आली. औरंगाबाद विमानतळावरुन मंगळवारी सकाळी संजय शिरसाट एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईच्या दिशेने रवाना झाले. यावेळी विमानतळावर संजय शिरसाट यांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार गेल्या दोन दिवसांपासून संजय शिरसाट यांची प्रकृती बिघडली होती. काल दुपारी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांची प्रकृती आणखी खालावली. सध्या संजय शिरसाट यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून संजय शिरसाट यांना उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे . मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार केले जातील. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संजय शिरसाट यांच्या भेटीसाठी रुग्णालयात जाणार आहेत, अशी माहिती देण्यात आली.