पत्राचाळ पुनर्विकासप्रकरण! शिवसेना नेते संजय राऊत यांची आज ED चौकशी
पत्राचाळ पुनर्विकासप्रकरणी ईडीने जारी केलेल्या समन्सच्या अनुषंगाने शिवसेना खासदार संजय राऊत यांची आज चौकशी होणार आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांच्या अडचणीत वाढल्या असून गेल्या काही दिवसांपासून ते अंमलबजावणी संचालनालय (ED)च्या रडारवर आहेत. राऊत यांना आज सकाळी 11 वाजता चौकशीसाठी बोलाविण्यात आले आहे.
संसदेचं अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे ED चौकशीसाठी हजर राहणार की गेल्या वेळेप्रमाणेच वकिलांमार्फत मुदतवाढीचा अर्ज करणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
याआधीही राऊतांना समन्स
दरम्यान राऊतांना याआधी 1 जुलैला पत्राचाळ प्रकरणार ईडीने समन्स बजावलं होतं. त्यावेळेस राऊत यांची 10 तासांपेक्षा अधिक वेळ चौकशी करण्यात आली होती.
काय आहे पत्राचाळ प्रकरण?
मुंबईतील गोरेगावमध्ये ही पत्राचाळ आहे. या पत्राचाळीच्या पुनर्वसनासाठी प्रवीण राऊत यांच्या मेसर्स गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनी पुढे आली.
राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि प्रवीण राऊत यांचं पत्राचाळीच्या पुनर्वसनासाठी म्हाडासोबत कंत्राट झालं. मात्र गुरु आशिष कन्सट्रक्शन कंपनीने भाडेकरुंसाठी आणि म्हाडासाठी सदनिका न बांधताच एकूण 9 विकसकांना तब्बल 901 कोटींना एफएसआय विकला.
गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीकडून मेडोज नावाचा प्रकल्प सुरु करण्यात आला. तसेच सदनिका विकण्याच्या नावाखाली 138 कोटींची माया जमा करण्यात आली.
मात्र यानंतर म्हाडाच्या अभियंत्याने याबाबत तक्रार दाखल केली. त्यानंतर ईडीची एन्ट्री झाली. ईडीने या प्रकरणात चौकशी सुरु झाली. ईडीला तब्बल 1039.79 कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा ईडीला संशय आहे. त्यापैकी प्रवीण राऊत यांच्या खात्यात 100 कोटी रुपये ट्रान्सफर करण्यात आले.
प्रवीण यांनी ही रक्कम आपल्या जवळचे मित्र आणि नातेवाईकांकडे ट्रान्सफर केली. या 100 कोटींपैकी 55 लाख रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनी दिल्याचं समोर आलं.