देश

वडाला फेऱ्या मारणं महत्वाचं नाही तर भावना महत्वाची, मेघना बोर्डीकरांनी चाकणकरांना सुनावलं

‘लग्न झाल्यापासून मी एकदाही वडाच्या झाडाला फेरे मारले नाहीत’, असं म्हणणाऱ्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांनी सुनावलं आहे. “वडाला फेऱ्या मारणं महत्वाचं नसतं. त्यातील भावना महत्वाची आहे. आपल्या माणसासाठी कुठल्याही पातळीला जायची तयारी ठेवणं, हा त्यामागचा खरा संदेश आहे”, असं ट्विट करत आमदार मेघना बोर्डीकर वट पोर्णिमेचं महत्त्व रुपाली चाकणकर यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय.

‘लग्नानंतर मी एकदाही वड पूजला नाही’, असे वक्तव्य राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दोन दिवसांपूर्वी विधवा प्रथा बंदीच्या कार्यक्रमात केले होते. त्यांच्या विधानावर समाजमाध्यमातून उलट सुलट प्रतिक्रिया येत आहेत. त्यांच्या वक्तव्यावर काही जण टीका करत आहेत तर काही जण रुपाली चाकणकर यांच्या रोखठोकपणाचं कौतुक करत आहेत. अशातच भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांनी ट्विट करुन चाकणकर यांच्या वट पोर्णिमेच्या युक्तीवादावर निशाणा साधला आहे.

मेघना बोर्डीकरांनी चाकणकरांना सुनावलं

“वडाला फेऱ्या मारणं महत्वाचं नसतं. त्यातील भावना महत्वाची आहे. आपल्या माणसासाठी कुठल्याही पातळीला जायची तयारी ठेवणं, हा त्यामागचा खरा संदेश आहे. तुम्ही करत नाही. पण व्रत न करण्याचा गवगवा करून व्रत करणाऱ्या इतर महिलांच्या भावना दुखावणारं हे कुठलं पुरोगामित्व आहे?”, असा सवाल बोर्डीकरांनी चाकणकरांना केला आहे.

“वटपोर्णिमेच्या सणाचा निसर्गाशी जोडले जाण्याचा उद्देश आहे, हे तुम्ही जाणीवपूर्वक विसरण्याचे कारण काय असावे? पुरोगामीत्वाच्या नावाखाली हिंदुत्वाला खुला विरोध हा आपला जुनाच अजेंडा राहिलेला आहे. तो सुरुच ठेवा. आमच्या धर्म, संस्कृतीचे त्यामुळे काहीच बिघडणार नाही”, असंही बोर्डीकर म्हणाल्या आहेत.

चाकणकर काय म्हणाल्या होत्या?

वटपोर्णिमेनिमित्त अनेक महिला वडाला फेरे मारुन पुढचे सात जन्म हाच पती मिळू दे, अशी प्रार्थना करतात. पण मी लग्न झाल्यापासून एकदाही वडाला फेरे मारले नाहीत. माझ्या सासरच्या मंडळींनी देखील मला कधी आग्रह केला नाही वा माझ्या नवऱ्याने पण कधी तसा हट्ट केला नाही. याबाबत मी भाग्यवान आहे. आपल्या समाजाला सत्यवानाची सावित्री फार लवकर समजली, परंतु ज्योतिबाची सावित्री अजून समजली नाही, अशी शोकांतिका राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केली.

Related Articles

Back to top button