india

“गडकरी पंतप्रधान असते तर…”, ठाकरे सरकारमधील नेत्यांचं मोठं विधान; पुन्हा एकदा चर्चांना उधाण

नितीन गडकरी मोदी सरकारमधील सर्वाधिक कार्यक्षम मंत्री म्हणून ओळखले जातात

भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नेहमीच आपल्या बेधडक वक्तव्यं आणि चोख कामासाठी ओळखले जातात. आपल्या भाषणांमध्ये राजकारणापेक्षा विकासकामांवर जास्त भाष्य करणारे नितीन गडकरी यांनी अनेकदा पक्षालाही खडे बोल सुनावले आहेत. कोणत्याही प्रकल्पाची आकडेवारी तोंडपाठ असणारे नितीन गडकरी मोदी सरकारमधील सर्वाधिक कार्यक्षम मंत्री म्हणून ओळखले जातात. यामुळेच अनेकदा गडकरी पंतप्रधान व्हावेत असं मतही सर्वसामान्यांसह अनेक राजकीय पक्षाचे नेते मांडत असतात. त्यातच आता बच्चू कडू यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा ही चर्चा रंगली आहे.

राज्यमंत्री बच्चू कडू बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूरला रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यासाठी आले होते, यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी नितीन गडकरींचं तोंडभरुन कौतुक केलं. नितीन गडकरी पंतप्रधान असते तर रोजी रोटीचा प्रश्न मिटला असता असं बच्चू कडू म्हणाले आहेत.

बच्चू कडू नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीन गडकरी यांच्यातील फरक सांगताना म्हटलं की, “मोदी पंतप्रधान झाल्याने मंदिर, मस्जिदचा प्रश्न मिटला. पण गडकरी चांगले व्यक्ती असून ते पंतप्रधान झाले असते तर रोजी रोटीचा प्रश्न मिटला असता”.

बच्चू कडू यांनी यावेळी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. “ज्यावेळी मोदींनी १०० रुपयांत गॅस वाटला त्यावेळी ४०० रुपयांत सिलेंडर मिळत होते. आज त्याची किंमत एक हजारच्या वर गेली आहे,” अशी टीका बच्चू कडूंनी केली.

Related Articles

Back to top button