india

शरद पवारांना नास्तिक म्हणणाऱ्या राज ठाकरेंना सुप्रिया सुळेंनी दिलं उत्तर; म्हणाले “सिद्धेश्वर मंदिरात गेले तर…”

अलीकडे नवीन नेते आपल्या भाषणात भान ठेवत नाहीत. केवळ भडक बोलणं योग्य नसल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना लगावला आहे. राज ठाकरेंचे मुद्दे मी खोडून काढू शकते असंही यावेळी त्यांनी म्हटलं. कराड दौऱ्यावेळी खासदार सुळे यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी आमदार शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे अध्यक्ष सारंग पाटील आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यावर ब्राम्हण समाज संतप्त होऊन रस्त्यावर उतरला असल्याबाबत विचारलं असता, काल यासंदर्भात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सविस्तर बोलल्याचं सांगत सुप्रिया सुळे यांनी अधिक बोलणं टाळलं. “सध्या महागाई हेच सर्वात मोठे आव्हान असून, आम्ही याबाबत अभ्यास करून केंद्र सरकारला सूचना करत आहोत. महागाई कमी होऊन लोकांना त्यातून दिलासा मिळावा यासाठी सातत्त्याने प्रयत्न सुरु आहेत,” असं यावेळी त्यांनी सांगितलं.

“शरद पवार यांना कुणी नास्तिक म्हणत असतील तर ते योग्य नाही. नुकतंच मी सोलापूरच्या सिद्धेश्वर मंदिरात गेली असता तेथील अध्यक्षांनी तुम्ही दुसऱ्यांदा येथे आलात. अजित पवारही दोनवेळा आलेत. तर शरद पवार येऊन गेले असून, त्यांनी या मंदिरासाठी निधीही दिला असल्याचं सांगितलं”.

“खरंतर एखाद्याच्या वैयक्तिक जीवनाबाबत बोलणं बरोबर नसून टीकाटिप्पणी चालूच राहते, आरोप होतात. त्यातून मतभेद व्हवेत पण, मनभेद योग्य नाहीत. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव, संस्कृती असते. आपल्यावर यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचे संस्कार असल्याने नको त्या वक्तव्यांवर बोलणे मी योग्य समजत नसल्याचं,” मत व्यक्त करताना मात्र मी वास्तवात जगणारी असून, वस्तुनिष्ठ माहितीवरच बोलते असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

केंद्र सरकारने गेल्या दोन वर्षात खासदार फंड दिला नसल्याचे सांगत याबाबत खासदार सुळे यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवारांनी आमदारांना त्यांचा फंड दिल्याचे सुळे यांनी ठळकपणे सांगितले. अलीकडे टीका-टिपणीचे वातावरण असले तरी राज्य सरकार जनतेच्या हिताच्या कामात व्यस्त आहे. या सरकारची करोना संकटकाळातही उत्तम कामगिरी राहिल्याचे केंद्र सरकारचा अहवाल सांगतो असं खासदार सुळे यांनी यावेळी सांगितलं.

Related Articles

Back to top button