अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणी वाढल्यात. मुंबई, सातारा पाठोपाठ आता त्यांना अकोल्याची जेलची हवा खावी लागण्याची शक्यता आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या फसवणुकीच्या आरोपांप्रकरणी सदावर्तेंवर अकोटमध्ये गुन्हा दाखल झालाय.
आधीच सातारा न्यायालयाने सदावर्ते यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यात दरम्यान सदावर्तेंना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी अकोट न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सुनावणी झाली असून न्यायालयाने सदावर्तेंना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांना परवानगी दिली आहे. या संदर्भात आज अधिकृत आदेश निघणार आहेत.
सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेल्या अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. एसटी कर्मचाऱ्यांची दिशाभूल करून पैसे उकळल्याच्या आरोपावरुन त्यांच्याविरुद्ध अकोला जिल्ह्यातील अकोट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसटी कामगार सेनेचे कार्याध्यक्ष अॅड. गुणरत्न सदावर्ते, त्यांच्या पत्नी अॅड. जयश्री पाटील आणि अजयकुमार बहादूरसिंह गुजर यांच्याविरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अजयकुमार बहादूरसिंह गुजर हे औरंगाबाद आगार क्रमांक 01 येथे मुख्य कारागीर असून कनिष्ठ वेतन एसटी कर्मचारी युनियनचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या संघटनेने बेकायदेशीर पद्धतीने एसटी महामंडळात संपाची नोटीस देऊन संप सुरु केला होता, असा आरोप करण्यात तक्रारदाराकडून करण्यात आला आहे.








