समीर वानखेडेंचं मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र, खोट्या प्रकरणात गोवण्याचे प्रयत्न
NCB अधिकारी समीर वानखेडेंनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी आपल्याला खोट्या प्रकरणात गोवण्याचे प्रयत्न करत असल्याचं म्हटलं आहे. संभाव्य कायदेशीर कारवाईपासून संरक्षण मिळण्याची मागणी देखील या पत्रात केली आहे.
समीर वानखेंडेवर गंभीर आरोप
आर्यन खान ड्रग्ज प्रकरण दाबण्यासाठी 25 कोटींची डील झाल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट करणारा व्हिडीओ समोर आला आहे. के.पी गोसावीचा बॉडीगार्ड आणि ड्रग्ज प्रकरणातील पंच प्रभाकर साईल याचा हा व्हिडिओ आहे. ड्रग्ज प्रकरण दाबण्यासाठी 18 कोटींची डील जवळपास फायनल झाली होती. शाहरूख खानच्या मॅनेजरसोबत मिटिंग देखील झाली होती. त्यातले 8 कोटी समीर वानखेडेंना दिले जाणार होते असा गंभीर आरोप प्रभाकर साईलने केला आहे.
समीर वानखेंडेंनी आरोप नाकारत लिहिलं पत्र
डील झाल्याचे आरोप समीर वानखेडे यांनी फेटाळले आहेत. आपल्याला खोट्या आरोपात गोवण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. समीर वानखेडे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. अज्ञात व्यक्तींकडून कायदेशीर कारवाईचा खटाटोप असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. संभाव्य कायदेशीर कारवाईपासून संरक्षण मिळावं अशी मागणी वानखेडे यांनी पत्रातून केली आहे.
25 कोटींची डील झाल्याचं स्पष्टीकरण
प्रभाकर साईलने या प्रकरणात अनेकांची नावे घेतली. ते पुढे म्हणाले, ‘छापेमारीनंतर काही वेळाने एक निळ्या रंगाची मर्सिडीज कार आली ज्यातून पूजा ददलानी खाली उतरते. पूजा ददलानी, सॅम डिसूझा आणि गोसावी मर्सिडीज कारमध्ये बसून बोलू लागले. 15 मिनिटांनंतर सगळे निघून गेले. यानंतर, गोसावी आणि मी मंत्रालया जवळ पोहोचले. गोसावी कोणाशी तरी बोलत होते. त्यानंतर ते वाशीला निघून जातात.
पुढे प्रभाकरने सांगितलं की, ‘वाशीहून त्यांनी मला पुन्हा ताडदेव जाण्यास सांगितलं. त्याठिकाणाहून त्यांनी मला 50 लाख रूपये आणायला सांगितलं. त्या पैशांनी भरलेल्या दोन बॅग घेवून मी वाशीला येतो आणि गोसावीला देतो. दुसऱ्या दिवशी पुन्हा गोसावीने मला बोलावले आणि ते पैसे सॅम डिसूझाला देण्यास सांगितले. संध्याकाळी 6.15 वाजता सॅम डिसूझाने मला हॉटेल ट्रायडंटला बोलावले जेथे मी त्याला पैशांनी भरलेल्या बॅग दिल्या.’
सध्या गोसावी फरार असून माझ्या जीवाला धोका असल्याचं देखील प्रभाकरने सांगितलं आहे. दरम्यान 2 ऑक्टोबरपासून आर्यन तुरुंगात आहे. 26 ऑक्टोबरला आर्यनच्या जामीन अर्जावर सुरूवात होणार आहे. आता या प्रकरणी काय होणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.