ठाण्यात शिवसैनिकांच्या हाती काठ्या; उपमहापौरांच्या पतीची रिक्षा चालकांना मारहाण
लखीमपूर खिरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आज, सोमवारी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. आज मध्यरात्रीपासून बंदला सुरुवात झाली आहे. राज्यातील काही भागांत बंद शांततेत सुरू आहे. तर, काही ठिकाणी बंदला हिंसक वळण लागले आहे. ठाण्यातील टेंभी नाका परिसरात उपमहापौरांचे पती व अन्य शिवसैनिकांकडून रिक्षाचालकांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर आज ठाणे महानगरपालिकेची (टीएमटी) बस सेवा आज बंद आहे. त्यामुळं इच्छित स्थळी जाण्यासाठी नागरिक रिक्षाचा पर्याय वापरत आहेत. आज सकाळपासूनच रिक्षासाठी नागरिकांनी मोठ्या रांगा लावल्याचे चित्र आहे. टीएमटी बस सेवा बंद असल्यानं नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. त्यासाठी रिक्षाचा वापर नागरिक करत आहेत. ठाण्यात काही तुरळक ठिकाणी रिक्षा सुरू आहेत. मात्र, बंद पुकारला असताना रिक्षा चालवत असल्याच्या कारणावरुन टेंभी नाका परिसरातील आनंद आश्रम परिसरात शिवसैनिकांनी रिक्षाचालकांना दांडक्याने मारहाण केली आहे. यावेळी ठाण्याच्या उपमहापौरांचे पतीदेखील यावेळी तिथे उपस्थित होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावरुन टीका होताना दिसत आहे.
‘सत्ताधारी जेव्हा रस्त्यावर येऊन दादागिरीने रस्त्यावरील रिक्षा व दुकाने बंद करते ही अत्यंत चुकीची पद्धत आहेत. शाखाप्रमुख, उपमहापौरांचे पती हे दादागिरीने रिक्षाचालकांवर काठी मारुन त्यांच्या काचा फोडतात, दुकानांचे शटर बंद करतात, हा कोणता कायदा आहे. कायदा आणि सुव्यस्था ज्यांनी पाळायची आहे त्यांनीच कायदा हातात घेतला आहे, हे निषेधार्ह आहे,’ असं मत भाजपचे ठाण्यातील गटनेते मनोहर डुंबरे यांनी व्यक्त केलं आहे.