‘शिवसेनेनं राम मंदिरासाठी दिलेले एक कोटी परत घ्यावेत’
अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी देशभरातून जमा करण्यात आलेल्या निधीमध्ये घोटाळा झाल्याचे आरोप होत आहेत. आम आदमी पक्ष व समाजवादी पक्षानं ईडी आणि सीबीआयमार्फत या घोटाळ्याची चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या सुरात सूर मिसळला आहे. शिवसेनेच्या या भूमिकेवरून भाजप भडकला असून शिवसेनेनं आपले एक कोटी परत घ्यावेत, असं सुनावलं आहे.
‘राम मंदिरासाठी जगभरातून शेकडो कोटींचा निधी येत आहे. प्रभू रामचंद्रांच्या नावानं एकही घोटाळा व्हायला नको. श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टमध्ये भाजपशी संबंधित सदस्य आहेत. शिवसेनेचा एकही सदस्य नाही. रामभक्तांच्या श्रद्धेस तडा जाईल असे काही घडू नये ही अपेक्षा असतानाच जमीन व्यवहाराचे संशयास्पद प्रकरण समोर आले आहे. ते खरे की खोटे याचा लगेच खुलासा झाला तर बरे. ट्रस्टनं याबाबत खुलासा करायला हवा, असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी राऊत यांच्या टीकेला अत्यंत कडवट शब्दांत उत्तर दिलं आहे.
‘लोकांनी श्रद्धा आणि विश्वासानं राम मंदिरासाठी देणग्या दिल्या आहेत, त्याचा व्यवस्थित हिशोबही ठेवला जातो. शिवसेनेला विश्वास नसेल तर त्यांनी दिलेले एक कोटी परत मागावे. त्यातून एखादी टिपूची मजार बांधावी. शिवसेनेच्या जीवावर मंदिर निर्माण सुरू नाही. शिवसेनेनं आता ‘हजरत टिपू’चा विचार करावा, राम मंदिराचा विचार करण्यासाठी संघ परिवार आणि हिंदू समाज सक्षम आहे,’ असं भातखळकर यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करते आहे. ही सुपारी कातरून तोंडात टाकण्याची ताकद हिंदू समाजात आहे हे विसरू नका,’ असा इशाराही त्यांनी दिला आहे.
भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी देखील शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. ‘वारीची परंपरा मोडीत काढणाऱ्यांनी टक्केवारीची परंपरा जोरात चालविली. महाआरती करणारे आता महावसुली करतात, आणि शिवरायांचे नाव घेणारे ख्वाजा गरीब नवाजचा आग्रह धरतात,’ असा टोला त्यांनी हाणला आहे.