देश

Cyclone Tauktae: चक्रीवादळाच्या तडाख्याने मुंबईचा थरकाप; वाऱ्याचा वेग ताशी ११४ कि.मी. पर्यंत!

तौत्के चक्रीवादळ मुंबईजवळच्या समुद्रातून पुढे सरकत असताना मुंबईला वादळाचा जोरदार तडाखा बसला आहे. वादळी वारे आणि पावसाने मुंबईला झोडपून काढले आहे. दक्षिण मुंबईत वादळी वाऱ्याचा कहर सुरू असून दुपारी दोन वाजता वाऱ्याचा वेग ताशी ११४ किलोमीटर पर्यंत पोहचला होता. वादळी वाऱ्यांमुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून पडली आहेत. त्यात काही वाहनांचे नुकसान झाले आहे तर काही ठिकाणी घरांचीही पडझड झाली आहे. दरम्यान, वादळाच्या पार्श्वभूमीवर रात्री आठ वाजेपर्यंत मुंबई विमानतळ बंद ठेवण्यात आला असून तेव्हाची स्थिती पाहून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. ( Cyclone Tauktae Mumbai Latest Update )

वाचा:सिंधुदुर्ग: देवगडच्या समुद्रात दोन बोटींना जलसमाधी; चार खलाशी बुडाले

मुंबईला चक्रीवादळाचा जबरदस्त तडाखा बसला आहे. सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे मुंबईकर हादरून गेले आहेत. तौत्के चक्रीवादळाची तीव्रता वाढल्याचा मोठा फटका मुंबईला बसला आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात महापालिकेची ६० स्वयंचलित हवामान केंद्रे असून या केंद्रांवर त्या-त्या ठिकाणी होत असलेल्या पावसाच्या नोंदी सह वाऱ्याच्या वेगाचीही नोंद घेतली जात आहे. या नोंदीनुसार मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आतापर्यंत सर्वाधिक वाऱ्याचा वेग हा कुलाबा परिसरात असणाऱ्या अफगाण चर्च नजीक नोंदविण्यात आला आहे. या ठिकाणी दुपारी १२.१५ वाजता १११ किलोमीटर प्रति तास एवढा वाऱ्याचा वेग नोंदविण्यात आला तर दुपारी दोन वाजता च्या सुमारास ११४ किलोमीटर प्रति ‌तास एवढा वेग नोंदविला गेला. मुंबईत पुढच्या काही तासांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्याचवेळी वाऱ्याचा वेग ताशी १२० किमी पर्यंत वाढू शकतो, असा सावधगिरीचा इशाराही देण्यात आला आहे.

मुंबईत वादळी वारे आणि पाऊस यामुळे स्थिती भीषण बनली असून पालिका व संबंधित यंत्रणा हाय अॅलर्ट मोडवर आहेत. मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी महापालिका मुख्यालयातील आपत्ती नियंत्रण कक्षास भेट देऊन मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेतला. त्याचबरोबर या अनुषंगाने महानगरपालिकेद्वारे केलेल्या विविध स्तरीय नियोजनाच्या अंमलबजावणीचा आढावाही त्यांनी घेतला. मुंबईत हिंदमाता, मिलन सबवे या भागात पाणी भरले आहे तर मोठ्या प्रमाणात झाडे कोसळली आहेत. उपनगरात काही ठिकाणी बैठ्या चाळींचीही पडझड झाली आहे. ही स्थिती लक्षात घेता नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button