देश

मराठा आरक्षणाबाबत फेरविचार याचिका दाखल केल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार : फडणवीस

केंद्र सरकारकडून मराठा आरक्षणाच्या बाबत फेरविचार याचिका दाखल करण्यात आली आहे. याबाबत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. शिवसंग्राम संघटनेचे विनायक मेटे यांच्या याचिकेवरून केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात फेरविचार याचिका दाखल केली आहे.

फडणवीस यांनी म्हटलं की, ‘१०२ व्या घटना दुरुस्तीनंतर एखाद्या समाजाला मागास ठरविण्याचे अधिकार राज्य सरकारांना नाहीत, असा चुकीचा अर्थ काढला जात होता. वस्तुतः केंद्र सरकारने आधीपासूनच ही भूमिका घेतली होती की, हे अधिकार राज्यांनाच आहेत आणि ते केंद्राने स्वतःकडे घेतलेले नाहीत. आधी उच्च न्यायालय आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात सुद्धा केंद्र सरकारने हीच भूमिका घेतली. आम्ही सुद्धा वारंवार हेच सांगत होतो. आता केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करून आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे. तशीही ही बाब सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायमूर्तींनी सुद्धा मान्य केलेलीच आहे. तातडीने ही फेरविचार याचिका दाखल केल्याबद्दल मी केंद्र सरकारचे आभार मानतो.’

१०२ व्या घटना दुरूस्ती नुसार राज्याला आरक्षण देण्याचा अधिकार आहे. राज्याचे आरक्षण देण्याचे अधिकार काढून घेतले नाही. राज्याच्या अधिकाराला बाधा पोहोचवता येणार नाही. अशी भूमिका केंद्र सरकार कोर्टात मांडणार आहे.

Related Articles

Back to top button